Sunday, August 27, 2006

सुखकर्ता


गणराया,विघ्नहर्त्या, सगळ्याना सुखी ठेव. सगळ्याना चांगली बुद्धी दे. तुझ्या आशीर्वादान सगळ्यांच मंगल होवुदे.

Tuesday, July 04, 2006

समर

नेहमी टोर्नडो,हुरिकेन ,Thunderstorm Warning किंवा हिट इन्डेक्स या पैकीच काहीतरी सांगणारं Weather चॅनल.
रात्रभर झड लावलेला पाऊस.
आणि पहाटे पहाटे पक्षाचा किलबिलाट ऐकत येणारी जाग.
सकाळी ब्लाईंन्ड्सच्या फ़टीतुन,जाळीदार पडद्यातुन चुकारपणे आत येणारी सुर्यकिरण.
थोड्याचवेळात स्वच्छ सुर्यप्रकाशान झगमगु लागलेल घर.
w/e ला Farmer's मार्केट मधला फ़ेरफ़टका.
हिरव्यागार उन्हाळी काकड्या ,कोबी, asparagus, काले ,ripened tomatos,हिरवे कान्दे ,झुकिनी, जांभळे नवलकोल,peas,भेंडी,मुश्रूम्स,सलाडचे विविध प्रकार, sqash यानी भरगच्च भरलेल्या बास्केट्स.
ब्ल्यु बेरी, स्ट्रॉबेरी , रॉसबेरीज,मेक्सीकन मॅन्गोज,कोवळ्या कणसांचे ढिग .
watermelons,cantaloupe,honeydews, चेरीज,लीची,पपई,पिअर्स,apricots यांचा भरुन राहिलेला वास.
ताज्या कट केलेल्या लव्हेन्डरचा ,गुलांबाचा सुगंध.
चकचकित उन्हात आखलेले Botanical garden मधले picnics.
झु मधली train सफ़ारी.
park ,स्विम्मिंग पूल मध्ये उसळलेला पोरांचा धुडगुस.
सुर्यास्ताच्यावेळी क्षितीजावर पसरलेले,रेंगाळणारे फ़िकट जांभळट केशरी रंग.
नर्सरी तली नविन कोरी रोप.
भाज्याच्या पसरलेल्या बीया.
नाजुक पालेभाज्यांची डुलणारी पान.
मंद झुळुका अनुभवत,बॅकयार्ड मधल्या झोक्यावर झुलताना दिसणारे झाडाचे हिरवेकंच रंग.
कुणीतरी लॉन mow करताना येणार तो करकरीत वास.
ताज्या गवताचा तो कोवळाशार लुसलुशीत स्पर्श.
4 th july च्या पार्टीचे प्लॅन्स.
मध्यरात्री पर्यन्त आकाश नक्षत्रानी भरुन टाकणारे फ़ायरवर्क्स आणि ते जास्तीत जास्त कुठुन चांगल दिसेल ते पहाण्यासाठी तासभर फ़िरवलेली कार.
बार्बेक्युज.
पाय दुखेपर्यंत केलेली पीच field trip.
स्व:ता तोडलेल्या peaches चा केलेला cobbler.
स्कर्ट्स आणि सॅन्डल्स घालुन चालताना येणारा फ़ताक फ़ताक आवाज.
vacation चे प्लॅन्स.
बीच वर अनवाणी पायाना गुदगुल्या करनारा वाळुचा तो ओलसर स्पर्श.
आणि लांबच लांब रात्री.
ऒह! I just Love Summer. Just..... Love It.

मला या सुंदर वातावरणात चुपके चुपके मधल ते "चुपके चुपके चल दी पुर्वईया .... हे गाणच आठवत.गाण्यातली ती तीन्हीसांज मला इथल्या समर मधल्या संध्याकाळसारखीच वाटते.
तसच वातावरण "किसीसे ना कहना" ह्या चित्रपटातल्या दिप्ती नवल झारीनं झाडाना पाणी घालत गायलेल्या गाण्यात आहेत.(त्या गाण्याचे शब्द काही केल्या मला आता आठवत नाही आहेत.)
मुखर्जीच्या, बासुदांच्या चित्रपटात camera चा प्रत्येक angle टवटवीत असतो. गाण्यात especially एक वेगळच वातावरण असत.पावुस झाल्यावर चमकणाऱ्या भिजलेल्या सुर्यकिरणांसारख.

एकतर त्यांचे चित्रपट भारतातल्या पावसाळ्यात पहावेत नाहीतर इथल्या निवांत समरमध्ये.
Especially बासुदांचा "छोटीसी बात".संपुर्ण चित्रपटात खंडाळ्याच्या पावसाळी वातावरणाचा तरल आणि soft effect जाणवत रहातो. चित्रपटात अमोल पालेकर गॅलरीमध्ये विद्या सिन्हाला बाय बाय करत असतो तेव्हा "ये दिन...." गाण सुरु असत. आणि पाउसही. का कोण जाने पाऊस आला कि ते गाण आणि अमोल पालेकरचा भाबडा चेहराच लक्षात येतो.

इतके दिवस काही लिहायला मिळाल नाही आणि फ़ारस वाचायलाही. (जणु काही कोणी मी लिहिलेल वाचन्याची वाटच बघत होत :P)असो. पण बाहेर वातावरण इतक सुरेख झाल्यावर काहीतरी खरडलच पाहिजे. नाही का?

Sunday, May 14, 2006

आईच मागणं

सतत मागामागी करु नये,अधिक पैशाच्या माग लागु नये,हावरट्पणा करु नये,उगाचच आळशासारख बसु नये,नेहमी उद्योगी असाव,भरपुर कष्ट करावेत,समाधानान आनंदी रहाव,तक्रारी करु नयेत आईच्या अनेक सुचनांमधल्या या काही सुचना.

यशस्वी,समाधानी,शहाणी, शिकलेली, आदर्श मुल असावीत अस जस जगातल्या सगळ्या "आई" लोकाना वाटत तसच माझ्या आईला ही वाटत.

अलिकडे मी तिच्याकडुन फ़ारस काही मागत नाही म्हणुन काल ती कधी नाही ते कौतुकान मला म्हणाली "तु अगदी शहाणी मुलगी झाली आहेस बघ.नाहीतर काहीजणांच्या मागण्या बघ,कधीच संपत नाहीत.पण तु तशी झाली नाहीस.मला बर वाटत. "

आई मला अगदी परफ़ेक्ट समजत होती.खरतर माझ्या असंख्य मागण्या असतात. हे हव, ते हव अस चालुच असत माझं नेहमी.
मला अगदीच ओशाळल्यासारख झाल . ती मला आदर्श समजत होती आणि ती मी नक्कीच नव्हते.

विचारात असताना अचानक माझ्या लक्षात आल, आईला मी perfect नाही अस सांगुन वाद घालत बसण म्हणजे तीन "आई" चा रोल यशस्वीरित्या पार पाडला नाही असचं सांगण्यासारख होत.

आपली तत्व आपल्या मुलानी आचरणात आणावीत, यशस्वी व्हाव आणि आपल्या पुढील पिढीलाही ते संस्कार द्यावेत हेच तर "आई" च यश आहे. आणि ते काम तीन अगदी perfect केल होत.आयुष्यभर हेच मागण तीन देवाकडुन मागितल होत.
काही गोष्टी तीलाही कधीकधी जमल्या नव्हत्या. पण आम्ही त्या करुन दाखवाव्यात अस मनापासुन तीला वाटत असत. त्याचा तिला अभिमान असतो.

आता आम्ही तीच्यापासुन लांब रहाताना तीला उगाच धाकधुक असते. आम्हाला वाढविताना काही चुकल तर नाही ना याची काळजी वाटत असते.
नुकतीचं पन्नाशीला पोहाचलेली ती थोडीशी रिकामी झालेली असते.जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात. अशावेळी कुणाकडुन तरी तीला "Good Job ,Well done" असे शब्द हवे असतात.
आईला अस काही म्हणण्याची पद्धत नाही. आपण तीचा "good job" गृहितच धरतो.
खरतर मुलं "चांगली" निघण्यातच तीच्या कष्टाच सारं चीज सामावलेलं असतं.

म्हणुणच मग "मी pefect नाही" हे तीला पटवायचा मी प्रयत्नच करीत नाही.

"हो ग आई. तु शिकवलेल मी काही विसरले नाही बघ.thanks आई. "मी नकळत तीला सांगुन टाकते.
ती मग विषय बदलुन इतर काहीतरी बोलत रहाते.पण ...
मला माहित आहे आपली पोरं वाया गेली नाही हे पाहुन तिन आनंदान मान डोलावली असेल, सुस्कारा सोडला असेल आणि ती समाधानान पदर खोचुन पुढच्या कामाला लागली असेल.
"आई" होण सोप नसत. ती नेहमीच म्हणते. आणि ते बरोबरच आहे म्हणा.
कारण afterall "Mom Is Always Right"

Wednesday, May 10, 2006

पुस्तक माझे मित्र

नंदन,ट्युलिप तुमचे मनापासुन आभार या खेळात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल.खरतर आता तुम्ही लोकानी इतक उच्च लिहिल्यावर मी काय डोंबल लिहिणार? खरच खुप मस्त लिहिलय तुम्ही.
स्वताच्या आवडीनीवडी विषयी लिहायच म्हणजे मला भयंकर संकोचल्या सारख होत. कारण माझ्या आवडी निवडी सारख्या बदलत असतात आणि मला अचानक कधीही काहीही आवडु/नावडु शकत.आणि त्यात काहीच संगतीही नसते.एकाचवेळी मला इजाजत आणि गोविंदाचा कुली नं १(guilty pleasures)
असे दोन्ही चित्रपट आवडत असतात. त्यामुळ ठाम अशी काहीच आवड नाही.
तरीही ...........
साध सरळ,समजायला सोप अस वाचायला मला अधिक आवडत. त्यामुळ क्लिष्ट अति गंभिर अस मी वाचायला हातात घेतल तरी बहुदा ते माझ्याकडुन पुर्ण होत नाही.
अवती भवती माणस नसताना, माणस असुनही एकाकी वाटताना, सुखात आणि दु:खात, 'चिमणराव' पासुन ते नातीचरामी पर्यंत ही पुस्तकच बरेचवेळा माझी मित्र मैत्रीणी बनली आहेत.
A friend in need is friend indeed या उक्तीप्रमाणे पुस्तक खऱ्या अर्थान माझी friends च आहेत.
स्वप्नात रमायला मला जरा जास्तच आवडत त्यामुळे आता इथे मी माझ्या लहानपणापासुन पाहिलेल्या (जेव्हा परदेशाचा चेहराही मी पाहिला नव्हता)'त्या' स्वप्नाबद्दल लिहावच लागेल.

"आपल्या घरात एक library असावी आणि तीथे उंच छतापर्यंत जाणारी पुस्तकानी भरलेली shelf असावीत,लायब्ररीला एक मोठी फ़्रेंच विन्डॊ असावी.Antique आराम खुर्ची असावी.एकतर बाहेर स्नो भुरभुरत असावा किंवा इंग्लिश गार्डन तरी फ़ुललेल असाव.खिडकीतुन दिसणारा बाहेरचा निसर्ग न्याहाळत पुस्तकांच्या पानांचाही आवाज न करता, coffee घेत निवांत आपल आवडत पुस्त्तक वाचाव." हे माझ्या असंख्य स्वप्नापैकी एक A perfect ideal dream आहे.
लहानपणी पारायण केलेल्या माझ्या आवडत्या शेरलॉक होम्स च्या पुस्तकातुन मी ती गार्डन ची कल्पना उचलली असावी बहुदा. नंतर 'चौघीजणी' वाचल्यावर त्यात इतर डीटेल्सची भर पडली इतकच.

पण यातली एखादी गोष्ट missing असली तरी पुस्तक वाचण थोडीच थांबणार आहे? श्वास घेण्यासारख ती ही एक आवश्यक गोष्ट आहे.एखाद पुस्तक हातात घ्याव ,झपाटल्यासारख ते रात्रभर जागुन संपवाव आणि मग थोडे दिवसानी परत ते हळु हळु वाचाव. अस मी कितीतरी वेळा केल असेन. दुसऱ्यांदा का कोण जाणे पण नविन बाजु समोर येतात.वेगळे अर्थ सापडतात.
first impression is the last impression हे मला माणसांबद्दलच नव्हे तर पुस्तकांबद्दल सुद्धा पटतच नाही. तुमचे विचार,तुमची भुमिका बरेचवेळा तुम्ही वाचलेली,तुम्हाला आवडलेली/न आवडलेली पुस्तक स्पष्ट करत असतात.
पुस्तक आवडल नाही अस कधी म्हणाव जेव्हा ते बऱ्याच वर्षानंतर सुद्धा परत हातात घ्यायची इच्छा होत नाही.
असो. आता नमनाला इतक घडाभर तेल जाळल्यावर माझ पाल्हाळ बास करते.

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:

पाडस
मार्जोरी किनन रॉलिंग्ज यानी लिहिलेल आणि राम पटवर्धन यानी अनुवादित केलेल हे पुस्तक हातात घेतल कि शेवटच्या पानापर्यंत तीतक्याच उत्सुकतेन वाचल जात.

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती
दिडशे वर्षापुर्वी एका छोट्या मुलाच्या भावविश्वात बाप,आई आणि जंगलातल्या असंख्य चमत्कारिक गोष्टीबरोबरच एका हरनाच्या पाडसाच आगमन होत.दोघांच एकमेकांवर नितांत प्रेम आहे. किंबहुना त्यांच स्वताचच एक चिमुकल विश्व त्यानी तयार केलय.पण जगण्यासाठी त्या कोवळ्या मुलाच एक दिवस निरागस बालपण हरवत.त्याला फ़ार फ़ार मोठ व्हाव लागत . पुस्तकात म्हटलय तस "जीवन सुंदर आणि सोप असाव अस प्रत्येकालाच वाटत.जीवन सुंदर आहे.पण सोप नाही."
या वरच आधारीत पण छोट्या मुलाना वाचण्यासारख 'हरिण बालक ' ही छान आहे.
आणखी एक पुस्तक सध्या वाचलेल म्हणजे आशा बगेच ' सेतु'.आयुष्यातला महत्वाचा बराचसा कालखंड परदेशी घालवुन परत मायदेशी परतलेल्या आई,वडील आणि मुलगा यांच्यातील नातेसंबधावर तसच त्यांच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर भाष्य करणार हे पुस्तक आहे.मला हे पुस्तक फ़ारस पटल नाही.
भालचंद्र नेमाडेच 'कोसला ' ही थोडे दिवसापुर्वी वाचुन संपवल.वाचल्यावर पटतच नाही कि लिहिलेल सगळ कल्पनेवर आधारीत आहे. आत्मचरित्रासारखा कादंबरीचा ढाचा असला तरी अवती भवतीच्या सामाजीक स्थित्यंतराच फ़ार मार्मीक वर्णन केलय नेमाड्यानी. एकदा तरी वाचाव अस अस वेगळ पुस्तक.
'एका चुलीची गाणे' हा 'शांता शेळके' यांचा नुकताच वाचलेला कथासंग्रह ही सुंदर आहे.
चकवा चांदण ,हसरे दु:ख हे चार्ली चॅप्लीन वर आधारीत आणि सुधा मुर्तीच कथा माणसाच्या, आता वाचीन.


३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके

काय लिहु आणि काय नको अस झालय मला.

१.स्मरणगाथा
२.स्मृतीचित्रे
३.आहे मनोहर तरी
४.मोगरा फ़ुलला
५.श्रीमानयोगी

याव्यतिरिक्त माझ्या all time favourite पुस्तकांची यादी द्यायचा मोह मला आवरत नाही आहे.
साधी सरळ,भाबडी आणि ७० किंवा त्यापुर्वीच चित्रण असणारी पुस्तक वाचायला तर मला खुपच आवडत.
त्यात मग निवडक द. मा मिरासदार,बंडु मोकाट सुटतो,चिमणराव,असामी असा मी ,झुळुक,पुन्हा झुळुक अशी असंख्य पुस्तक माझ्या आवडीची आहेत.

आनंदी गोपाळ,स्वामी,मृत्युंजय,ययाती,पुर्वरंग,व्यक्ती आणि वल्ली राजा रवि वर्मा,छावा,एक होता कार्वर, ही पुस्तक न वाचलेले मराठी लोक फ़ारच कमी असतील नाही?

ऑक्टोपस , महानंदा , झोंबी , नाच ग घुमा , एक होती आजी, तुंबाडचे खोत , पडघवली ,शितु , बनगरवाडी माणदेशाची माणस,ईडली,ऑर्कीड आणि मी ही माझी आणखी काही आवडीची पुस्तक.

जी ए ची पिंगळवेळ,काजळमाया ,रमलखुणा,काजळमाया,निळासावळा दर वेळी मी नव्यान वाचते आणि नविनच अर्थ त्यातुन काढायचा प्रयत्न करते.अर्थात हे मुंग्यानी मेरु पर्वत गिळण्याचा प्रयत्न केल्यासारख आहे ते.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके

१. शाळा मिलिंद बोकिल
२.गोठलेल्या वाटा शोभा चित्रे
३.हंस अकेला मेघना पेठे
४.ऐसपैस गप्पा दुर्गाबाईशी प्रतिभा रानडे
५.चीनी माती मीना प्रभु

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे

'स्मृतीचित्रे' हे पुस्तक मला फ़ार आवडत.साध्या साध्या गोष्टीत आनंद ,सुख शोधणाऱ्या,प्रसंगी स्व:तावर विनोद करनाऱ्या लक्ष्मीबाई बद्दल मला नितांत आदर वाटतो. बाळबोध मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात कुठही " मी जिद्दीने काही मिळवल" असा अभिनिवेश नाही. आव नाही. कुठेही आपण कस दु:ख सोसल त्याच चर्हाट नाही. पुस्तकाच्या मागे लिहिलय " कोणतेही प्रचलीत शिक्षण न घेता केवळ कठीन परिस्थितीशी लढा देवुन मन किती सुससंकृत होवु शकते याचे चित्रण या पुस्तकात आढळते."
कितीही वेळा वाचल तरी परत परत वाचाव असच पुस्तक आहे "स्मृतीचित्रे".

पुढचा डाव
गिरिराज
मिंट्स
कुल_सुभाष
खेळणार का तुम्ही?

Sunday, April 16, 2006

नवी सुरुवात

आपण जे 'नाही' आहोत ते 'असण्याचा' आभास निर्माण करण म्हणजेच "Stupid" असण अशी stupid या शब्दाची नविन व्याख्या oprah न परवाच्या कार्यक्रमात केली.
म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसली तरी इतर चार लोकाना ती आवडते म्हणुन आपल्याला पण आवडते अस म्हणन,पटल नाही तरी आपण वेगळं पडन्याच्या भितीन पटल अस सांगण अशा कित्येक गोष्टी यात येतील.
एकुण काय कि खोट्या मुखवट्याखाली स्वताला दडपुन टाकायच.
स्वताला नेमक काय हवय ते कधीच न कळण हे आणखी एक stupid असण्याच लक्षण.
आपल्या पैकी कित्येक जण अस कितीतरी वेळा करीत असतील. गरज पडेल तेव्हा,वेळेनुसार आपण मुर्ख बनतच असतो.
कारणं अनेक ,पण बरेचवेळा आपल खर रुप झाकण्याचा आपण प्रयत्न करीत असतोच.
आज हे लिहिण्याच कारण म्हणजे खऱ्या अर्थान मी एका नविन विश्वात, माझ्या आवडत्या जगात पाऊल टाकत आहे.
Yeah, मी परत विद्यार्थी व्हायच ठरवल आहे.पण यावेळेस माझ्या आवडत्या विषयाची. समोर उभ असलेल चांगल करियर(पण मला फ़ारस न आवडनार) आणि मेहनतीन मिळवलेला अनुभव या सगळ्याला मागे टाकुण मी नव्यान, नवी डीग्री घ्यायच ठरवलय.
बऱ्याचजणानी मला वेड्यात काढलय. Dream Job वैगरे काही नसत असही सुनावलय. पण माझा निर्धार अगदी पक्का झालाय.
काही स्वप्न उघड्या डोळ्यानी ,जागेपणी पाहिली तरीही ती खरी होतात का ते मला माहित नाही.
पण मला हे नक्कीच माहित आहे की अस ,हाताशी असलेला हुकमी एक्का टाकुन नव्यान हा जुगार खेळण तितक सोपही नाही.
पण कधी कधी ना मी हे करणारच होते. माझा निर्णय कदाचीत बरोबर ठरेल आणि कदाचीत अपयशी सुद्धा ठरेल.
पण निदान मनाजोग काम करण्याच समाधान नक्कीच मिळेल.
नव्यान मला जे आवडत तेच करण आणि ज्यात माझ मन कधीच रमल नाही त्याचा त्याग करण हे अगदी 'Dream come True' सारख आहे.
त्यामुळ सध्या तरी 'Am I being stupid? ' या प्रश्नाच उत्तर 'No,I am not" असच आहे.

Thursday, March 30, 2006

झाड आणि कर्तव्य

एक झाड होत. मुळ अगदी घट्ट रोवलेल. मजबुत बुंध्याच. वारा सुटला कि मजेत शिळ घालायच. हलायच डुलायच. वाऱ्याच्या मंद झुळकेसरशी गाणी गायच. हिरव्यागार पानानी लहडलेल्या त्याच्या फ़ांद्या फ़ाद्यातुन चैतन्य ओसंडायच. त्याच्या गर्द छायेखाली येणारे जाणारे पांथस्थ क्षणभर थबकायचे.तॄप्त होवुन नव्या दमान पुढची वाटचाल करायचे. पाखरानी झाडावर घरटी बांधली होती.त्यांच्या किलबिलाटान झाडही सुखावायच. मायाळू व्हायच.
आपल कर्तव्य व्यवस्थित बजावुन झाड साऱ्यानाच सुखी ठेवायच आणि स्वताही समाधानान जगायच.
अशीच बरीच वर्ष गेली. झाडाच्या छोट्याश्या जगात सारे एकमेकाला सांभाळुन घ्यायचे. झाडाकडुन सल्ला घ्यायचे.त्याच ऐकायचे.त्याच्या मतांचा आदर करायचे.
सार काही ठीक चालल होत.
अचानक एक दिवस झाडाला कंटाळाच येवु लागला.
"काही तरी वेगळ घडायला हव? या जगाच्या पलिकडॆही काहीतरी असेलच ना. तीकडे जायला हव. नविन पहायला हव. "त्याच्या मनात असंख्य उर्मी दाटुन आल्या होत्या.
त्यान देवाकडे मागणी केली.
"मला कंटाळा आलाय. माझ क्षितीज थोड विस्तारु दे. नव जग मला पाहुदे."
"हो. पण या जगापेक्षा निराळ जग तिकडे असणार आहे. हे लक्षात ठेव हं." देव म्हणाला.
"बघु दे तरी मला." झाडान उत्सुकतेन म्हटलं.
देवान झाडाच्या फ़ांद्या उंचच उंच नेल्या.
झाडान आता गगनाला गवसणी घातली होती.
सार जग त्याच्या नजरेच्या टप्प्यात आल होत.
अनेक प्रकारची नवनविन लोक त्याला दिसु लागली.
लोक इकडे तिकडे नुस्ती धावत होती.पण इकडच्या सारखी छोटी पायवाट तिकडे नव्हती. खुप मोठा रस्ता होता. सिग्नल होते. असंख्य मोटारी धावत होत्या.
वाहतुकीचे नियम काही जण पाळत होते आणि काही जण नाही.
"हे हे भयंकर आहे. अशी कशी लोक वागतात?नियम पाळा." झाडान मध्येच जावुन सांगण्याचा प्रयत्न केला.
काहीनी ऐकल. काहीनी नाही. झाड अगदी हताश होवुन गेल.
" नवनविन लोकोपयोगी शोध लावले पाहिजेत. नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. नुस्त शास्त्राच शिक्षण घेवुन उपयोगी नाही." झाड शाळांमध्ये जावुन ओरडु लागल.
काहीनी ऐकल. काहीनी नाही
"नोकरशहा भ्रष्टाचारी आहेत. त्यानी काम केली पाहिजेत.राजकारणी पैसे खातात." झाड त्रास करुन घेवु लागल.
"लोक संस्क्रुती जपत नाहीत. आपल्या भाषेचा अभिमान बाळगत नाहीत." झाड तक्रारींचा पाढाच वाचु लागल.
झाडाला जगात सगळ वाईटच दिसु लागल.आणि प्रत्येकान त्याला हव तस बदलाव अस त्याला वाटत होत. काही बदलले. काहीना झाडाच म्हणन मुळीच पटल नाही.
झाड उदास होवुन गेल .ते खंगु लागल. झुरु लागल.उपाशी राहु लागल.
त्याच स्वताकडे लक्षच नव्हत.त्याची पान गळु लागली. आल्यागेल्यान सावली देणार झाड आता ओकबोक झाल होत.
ते आपल सावली देण्याच कामच विसरुन गेल. वसंतात फ़ुलणारी फ़ुल यावेळी झाडावर फ़ुललीच नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे आता फ़ळांचा रुतु सुरु होणार होता......
पण जगाची चिंता करता करता झाड स्वताचे नियम विसरुनच गेल.
"देवा, देवा हे अस का? जग बदलत का नाही?लोक आदर्श का वागत नाहीत?स्वार्थीपणान दुसऱ्याचा विचार का करीत नाहीत?
आपली कर्तव्य पार का पाडीत नाहीत?हा अनाचार मला सहन होत नाही आता."झाड अगदी उद्विग्न होवुन गेल होत.
देवान मंद स्मित केल.
"असं. पण तु तरी तुझ कर्तव्य कुठ पार पाडलयस? इतरांना सुधारता सुधारता तु तुझ कर्तव्य विसरलास.नियम मोडलेस.
विश्वाची चिंता वाहता वाहता तु सावली द्यायच थांबवलस. तक्रारी करता करता वसंत आला आणि गेला सुदधा .तुला कळलही नाही.तुझ्या आसऱ्यावर जगणाऱ्या पाखरांना तु विसरला नाहीस?"
झाड अगदी शरमुन गेल.देवान झाडाला कुरवाळल.
"हे बघ!आता जगाच्या तक्रारी करण सोड.तुझं काम अगोदर नीट पार पाड.तुझ्या अंगावर फ़ुल,फ़ळ फ़ुलु देत.जगाची चिंता करताना तुझ कर्तव्य चुकवु नकोस."
झाडाला आपली चुक उमगली.त्यान वाळलेली पान झटकली.मुळ अगदी तहानलेली होती. इतके दिवस त्यांची अगदी आबाळच झाली होती. अन्न पाण्यान आता ते पुर्वीसारखच हिरवगर्द होवुन गेल. सावली देण्याच आपल कर्तव्य पार पाडु लागल.त्याच्या अंगाखांद्यावर पाखरांनी पुन्हा आश्रय घेतला.झाड कौतुकान त्यांची किलबिल ऐकु लागल.
जग सुंदर करण्यासाठी आपला खारीचा हातभार लावु लागल.
झाडावर फ़ुल परत उमलली. फ़ळ धरु लागली.ते आपल्या कर्तव्यात निमग्न होवुन गेल. विश्वाची चिंता वहायच काम त्यान देवावर सोपवल आणि ते सुखान मार्गक्रमण करु लागल.

Sunday, March 19, 2006

गोधडी

बरेच दिवसापुर्वी गोधडीविषयी लिहुन ठेवलेल.
.....................................


काहीवेळा अवचित वाटेवरती भेटलेली अनोळखी माणस जुन्या काळातले काही संदर्भ आठवुन ओळखीची वाटु लागतात.वाटत ह्याना आपण भेटलेलो कधीतरी.
माझ्या क्विल्ट च्या weekend ला चालणाऱ्या क्लासटीचर मिशेलला पाहुन मला अशीच ओळखीची खुण भेटल्याचा आनंद झाला. स्वताच्या नातवंडाविषयी बोलताना तीचा फ़ुललेला चेहरा आणि दाटुन आलेले डोळे पाहुन क्षणभरच मला मिशेल नाही तर दुसरच कुणितरी असल्याचा भास झाला.जगाच्या पाठीवर कुठही गेल तर आजी अशीच असते का? माझ्या लेकीची आजी झाल्यापासुन माझी आई ही काहीशी वेगळीच भासते मला.

धावदोरा घालता घालता लक्षात आल गेल्या कित्येक दिवसात हे काम मी केल नाही तरीही टाके इतके सफ़ाईदार पडत होते. इतक्या दिवसानंतर सुद्धा जणु काही मी ते करायच कधी विसरलेलेच नव्हते. माझ्या आजीन दिलेल्या अगणित देण्यापैकी हे ही देण मी खोलवर कुठतरी बंदिस्त करुन ठेवल होत. कापडावर धावदोऱ्याचे बारीक ठिपके ,माझ्या घरासमोरच्या रांगोळीसारखे उमटत गेले.आणि आजीच्या आठवणीच्या रेशमी लड्या उलगडु लागल्या.

केळीच्या बागा आणि पानमळ्यामुळ संपन्न असलेल्या माझ्या आजीच्या गावात येताना शेतात बहुदा एक तरी मोर दिसायचाच, पण या सगळ्याहुनही ज्या ओढीन या गावात मी येत होते, मवु कापसासारख मुलायम अतरंग असलेल्या माझ्या आजीसाठी.

गावाच्या आतल्या बाजुला असलेल्या आमच्या भल्याथोरल्या दगडी घराच दुरुनच, उंच धुराड आणि कौल दिसु लागत.अगदी घराच्या समोर गेल तरच घराची भव्यता कळे. दडदड चढुन ३ पायऱ्या गेल कि सोपा,बैठी खोली त्यात मांडलेली पांढरीशुभ्र लोड तक्क्याची बैठक,मग भल थोरल मधल घर.आणि शेवटी आजीचा अखंड वावर असलेल ,लखलखित स्वयंपाकघर.

दुपारच्या अगदी शांत वेळी त्या दगडी घरात, डोळ्याच्या खाचा झालेली आजी तीची जुनी पत्र्याची ट्रंक काढून आतल्या घरात गोधड्या विणत बसलेली असायची.बाहेर उन्हाच्या रखरखाटान डॊळे दीपुन जायचे.पण माळीत मात्र त्या उन्हाची तीरिप सुद्धा जाणवायची नाही .

त्या ट्रंकेत चांदीचे बंदे रुपये ,कधीतरी वापरायच्या कपबशा,अत्तरदाणी,गुलाब जल,कात,रक्तचंदनाची बाहुली,वेखंड,जपाच्या माळा अस बरच काही किडुक मिडुक असायच .

घरी गे ल कि कधी एकदा ती ट्रंक उघडुन बघेन अस मला व्हायच.सगळ्याचा तो संमिश्र असा गंध मला मनापासुन आवडायचा.

गोधड्या विणत बसण हा आजीचा अगदी आवडता उद्योग. जुन्या डब्यात विणायच सामान जड लोखंडी कात्री,दोरे,सुया,टेप , शिसपेन्सिली अस बरच काही असायच.तुकडे बेतुन झाले की रंगसंगती साधुन तीच शिवण सुरु व्हायच.बरचसं काम अंदाजान. एकदा मनाजोगे तुकडे जोडुन झाले कि मग ती ते धावदोरा घालुन शिवायला सुरुवात करे.एकसारखा टाका घालायला तीनच तर मला शिकवलेलं.

ट्रंकेजवळच्या गाठोड्यात जुन्या कपड्याव्यतीरिक्त जरीचे परकर पोलक्याचे तुकडे,तीच्या वडीलानी दिलेली ली एकुलती एक खऱ्या चांदीची जरीची साडी अशा बऱ्याच प्रिय आठवणी होत्या.
आपला थरथरनारा हात त्यावर फ़िरवीताना तिच्या,डोळ्याच्या कडाना जमा झालेलं पाणी मी कित्येकदा पाहिल होत.

अगदी लहान असताना पोरक झालेल्या तीच्याजवळ या तुकड्याखेरिज भुतकाळाशी बांधुन ठेवणार काही नव्हतच.नकळतच प्रत्येक नविन तुकड्यासरशी नविन आठवण समोर यायची.मनाजोगत काम करण्याच्या नादात आजीही मनसोक्त बोलत राही.

पण थोड्याच वेळान उन्ह खाली यायची. धारेची वेळ झालेली असायची. गडी माणस यायला लागायची. इच्छा नसतानाही उठावच लागे तीला.

आमची जमीन भरपुर असल्यामुळ,घरी पुष्कळ धान्य येवुन पडायच. आजी वाटेकऱ्याच्या बायकांना हाताशी धरुन धान्याची साफ़सफ़ाइ करायची. मी जायचे तेव्हा आजी परड्यात कोथिंबीरीचा वाफ़ा तयार करायचा,घेवडा,वांगी तोडण यातल काहीतरी करीत असे.

गोळा केलेली फ़ळ, भाजी बरेचवेळा ती वाटुन टाकायची. आजोबाना ते आवडायच नाहे.आजीला व्यवहार कधीच जमला नाही.आजोबा स्वभावाने थोडे तुसडेच.वाईट अनुभवामुळ व्यवहारी बनलेल्या आजोबाना आजीच हे भावनाप्रधान वागण पसंद नसे.तीला बरच ऐकुन घ्याव लागे.अशावेळी वाद घालण्यापेक्षा ती गप्पच बसुन राही.पण तीचा मुळचा मदत करण्याच्या स्वभाव काही बदलत नसे.

आमच्या पाठिमागच्या खोलित हारीन लावलेली पिंप,पत्र्याचे डबे आणि एक मोठ थोरल शिसवी कपाट होत.मुरांबे,लोणची निगुतीन घालुन बरणी पांढऱ्या शुभ्र कापडान बांधुन ती आमची वाट पहात असायची. माझे सारे हट्ट पुरवणाऱ्या आजीला डबे शेवयान भरुन ठेवण्याच्या कामात माझी ढ्वळाढवळ चालायची नाही. मग मांडुन ठेवायच काम माझ्याकडे.मला वाटायच आजीन अगदी शाबासकी द्यावी मला. आजीच एक ठरलेल होत "बर झालय".

तीच्या द्रुष्टिन सगळ बरच असायच. फ़ार चांगल ,फ़ार वाईट अस काही नव्हतच.

आमच्या घराच्या मागे,परड्यात जाईचा एक विलक्षण देखणा पाना फ़ुलान बहरुन गेलेल असा वेल होता. त्याचा आखिव मांडव ही आजोबाची अगदी खासियत होती.संध्याकाळी त्यातली कळीन कळिन हलक्याशा झुळकेबरोबर उमलायची. आजी पहाटे उठायची आणि देवाच बारीक गुणगुणत फ़ुल तोडायची.
पहाटेच्या मंद वाऱ्यात डुलणाऱ्या त्या कळ्यामुळ सारा आसमंत, घर वासान दरवळुन जायचा.मला वाटायच तीन फ़ुल तोडण कधी थांबवुच नये.पण मग तीची मंदिरात जायची वेळ होत असायची.

मंदिरातल्या पुजेची घंटा वाजु लागे. मग मी तीच्या पुजेच्या सामानात लुडबुड करीत असे. तीच सारच काम इतक नीट नेटक आखिव रेखिव आणि सुंदर असायच.स्टीलच्या मध्यम डब्यात तांदुळ,निरांजन,अष्टगंध,आरतीसाठी चांदीची छोटी ताटली अस सगळ रचलेल असायच.मी फ़ुल डब्यात ठेवायचे.तोवर तीन फ़िकट पांढरट बारीक फ़ुलाफ़ुलाच्या print च पातळ नेसलेल असायच.आणि ती फ़णेरीपेटी समोर घेवुन बसे. अनेक उन्हाळे पाहीलेले तीचे काळे पांढरे केस तर मी लहान असल्यापसुन जसे च्या तसेच होते.बारीकसा अंबाडा घालुन झाला कि थोडस मेणाच बोट लावुन त्यावर ती कुंकु रेखी.

मग चंदनाचा वास असलेली पावडर ती फ़क्त मला लावण्यासाठी आणे.त्या पावडरीचा इतका सुरेख वास तीच्या पातळाला यायचा!
मंदिरात बाहेर भली मोठी सहाण आणि चंदनाच खोड होत. मी गंध उगाळायला घ्यायचे.ती सांगायचे "अगं, एकसारख फ़िरव. हाताला थोडी लय असुदे"

आजी मंदिरात ,देवाच्यासमोर खुप वेगळी भासायची. फ़ार फ़ार दुर गेल्यासारखी अनोळखी अशी.समईच्या मंद प्रकाशात तीच्या चेहऱ्यावरचे ते तृप्त भाव निरखायची सवयच लागलेली मला. देवाशी ती इतकी समरस होई कि समईच्या ज्योतीमधला आणि तीच्यातल फ़रकच नाहीसा होई.

देवाच इतक करुन तीला काय मिळवायच असायच?'मोक्ष' तीच ठरलेल उत्तर.मला वाटायच परमेश्वराच ती एवढ करते मग ती ही काहीच कस मागत नाही. माझ्या तर रोज देवाकडुन असंख्य मागण्या असत.

आजीच्या साध्या साध्या इच्छा सुद्धा कधी कधी अपुऱ्या राहुन जायच्या. पण ती तक्रार करायचीच नाही. कुणी तीच्या मनातल ओळखल नाही तर ती मनस्वी दुखी व्हायची. का कोण जाणे आजोबाना ते कधीच कळल नाही कि त्यानी कळुनही डोळे बंद करुन घेतले होते?. तीचे आणि आजोबांचे सुर जुळले नाहीत ते यामुळच.

रात्री आजी गोष्टी सांगायची बरेचदा.तीच्या गोष्टी मध्ये राजा,रानी,पऱ्या अगदीच नसायचे.तसले काही चमत्कार नसतातच असा तीच ठाम विश्वास होता.पुराणातल्या गोष्टी,बालपणीच्या आठवणी ऐकण्यासाठी मी ही मान डोलवायचे. रात्री आकाशातले तारे तीला अगदी अचुक ओळ्खता यायचे. मग कधी सप्तर्षीची ,तर कधी ध्रुवाची गोष्ट ऐकायला मिळे. नीरव शांततेची ती गुढ रात्र मग आणखीनच अदभुत आणि रम्य वाटु लागे.

माझ लग्न ठरल तेव्हा ती आमच्या घरी आली होती.त्या दिवशी तीच ते केविलवाण रुप मला अक्षरश: व्याकुळ करुन केल. ती फ़ार फ़ार एकटी झाल्यासारखी वाटली.
लग्न झाल्यावर तीच्याकडॆ गेल्यावर येताना तीन हातावर दही ठेवल आणि दह्याबरोबर एक गोधडी. त्या गो्धडीत मला ते परकर पोलक्याचे चंदेरी जरीचे तुकडॆ स्पष्ट दीसले. काही न बोलता आजीन माझ मस्तक हुंगल माझ्या कानशीलावरुन बोट फ़िरवली.माझ्या ह्र्दयात कालवाकालव झाली. मला वाटल ती माझा कायमचा निरोप तर घेत नाही ना? मन अगदी वाईट शंकानी डागाळुन गेल.मला तो क्षण जितका होईल तितका लांबवायचा होता.अस्वस्थ होवुन मी तीला गोधडी पुढच्यावेळी नेते अस सांगितल. नंतर जमलच नाही जायला.

आज, आजी गेली त्याला बरेच दिवस झाले आहेत. काही दिवसापुर्वी आजोबाही गेले. घर अगदीच रिकाम झाल.आता गावही खुप बदललय.ठरावीक एस्ट्याचे येणारे आवाज इतर असंख्य गाड्याच्या कोलाहलात हरवुन गेलेत.आणि त्या आवाजांचा वेध घेत चिमणीसारखी आमची वाट पहानारी आजी ही. घरी कुणितरी येवुन जावुन असायच पण ते भकास च झाल होत. मायेचा हात फ़िरवनार फ़ारस कुणी तीथे नव्हतच. कुणाला तितका वेळ ही नव्हता.

परवाच्या पावसात घराची एक बाजु संपुर्ण ढासलली. घर भिंतीवीना उघड पडल.पोरक तर ते आधिच झाल होत. नविन भिंत बांधुनही फ़ारसा उपयोग होणार नाही अस सगळ्याच मत झाल.पाउस सगळाच सपासप येत होता. आणि आला तरी त्याला अडवण्यासाठी कोणि नव्हतच तीथ. तिथ माझ जाण तसही थांबणारच होत.माझ्या मनातल 'आजीच घर' जसच्या तस जपण्यासाठी तर आता मी तीथे जाणारही नाही.

त्या गावातल्या धुळीन माखलेल्या पायवाटांवर गाईंच्या पायरवात, माझ्या पाउलखुणा उमटलेल्या असतीलही अजुन कुठतरी. कुणास ठाउक, कुणी सांगाव.पण ती पायवाटच आता मला अनोळखी वाटते. त्या पायवाटेवरच माझी वाट न पहाणार,ते पडलेल घर माझ नक्कीच नाही. मग त्या पाउलखुणा तरी कशाला शोधीत जायच? पण मागे रेंगाळणाऱ्या आठवणींची मोरपीस अशी कधीतरी अलगद गवसतात. माझ वेड मन अगदी सैरभर होवुन जातं.
इतक्या सुंदर क्षणांची साक्षीदार केलेल्या,भुतकाळातल्या याच मायेच्या धाग्यानीच तर घट्ट बांधुन ठेवलय मला माझ्या मातीशी.

आजीच्या असंख्य देण्यानी माझ आयुष्य विविध आकाराच्या,अनुरुप रंगाच्या,तलम तुकड्याच्या गोधडी सारख देखणं झालय. आणि आता त्याच संलग्न धाग्यानी माझ्या आईला आणि लेकीला जोडलय.मग एखाद्या दुपारी त्याही वीणतीलच मायेची ,सुखाची गोधडी .

क्लास संपला.मिशेलचे मी आभार मानले.

घरी,नव्यान तयार केलेल क्विल्ट निरखीत बसले होते.खिडकीतुन दिसणार निरभ्र मखमली आकाश ताऱ्यानी भरुन गेल होत. साऱ्या वातावरनात जाईचा सुगंध व्यापुन गेल्यासारखं वाटल.हातातल्या क्विल्टच्या उबदार आश्वासक मिठीन मन भरुन आल होत.नकळत डोळे पाणावले.
दुरवर कुठतरी मंदशी चंद्रज्योत क्षणभर चमकल्यासारखी झाली.क्षितिजावर सोनेरी चंदेरी जरीच्या प्रकाशकणाची उधळण झाली.मंद सुखकर अशी उबेची मीठी त्या चंद्रज्योतीची होती की हातातल्या क्विल्टची माझ मलाच उमगेनास झाल.
भारणाऱ्या त्या सुगंधाच्या सहवासात,लुकलुकणाऱ्या सात्वीक ,सोज्वळ नक्षत्राच्या साक्षीन मी मुकपणे तशीच बसुन राहीले.

Monday, March 06, 2006

सुर

सुर किती भरुन टाकतात नाही आपल्या आयुष्याला?. एखाद गाणं ,एखादी ओळ किती ही वेळा ऐकली तरी समाधानच होत नाही.परत परत ती गुणगुणाविशी वाटते. अगदी मनात साठुन,आपल मन काठोकाठ भरुन जाइपर्यंत. समुद्राच्या गाजेचा,नदीच्या खळखळ आवाजाचा,एकसारखा छतावर थेंब थेंब वाजणाऱ्या पावसाचा, पानगळ सुरु झाल्यावर वाऱ्याच्या झझांवातात पानाच्या भिरभिरीचा, सुर ऐकताना वाटत आपण त्यातच एकरुप होवुन जाव.कि आपणच त्यांचा एक भाग होवुन जाव.
सुरांमध्ये केवढी ताकत आहे नाही?अद्रुश्य राहुनही ते माझी सतत माझी सोबत करीत रहातात. माझ्या भोवती फ़ेर धरुन आपल्या अस्तित्वाची जाणिव करुन देतात. सारा निळा आसमंत ओला होतो. बकुळीच्या फ़ुलाच्या गंधान मोहरुन जातो.
सुराच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण जणु मला नवा भासतो.रोज वाटेवर भेटणारी माणस, रोजचाच तो रस्ता मला वेगळाच वाटतो. सुराच हे सुरेल गाण मग मला परत परत गुणगुणावस वाटत.गावस वाटत. बोलता बोलता आपल्यालाला स्तब्ध करणारे हे सुरेल सुर आपल्या आयुष्याला किती भारुन टाकतात नाही?

काल पहिल्यांदाच संदिप खरे यांच हे गाण ऐकल आणि पुन्हा पुन्हा ऐकावसच वाटल.
यातल्या हलते या शब्दान तर खरोखरच आतुन काहीतरी हलल्यासारख वाटत.

अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते!
बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
कशी शांतता शुन्य शब्दात येते।

कधी दाटु येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा।

कधी ऐकु येतो क्षणांचा इशारा
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
नभातुन ज्या रो जातो बुडोनी
नभाशीच त्या मागु जातो किनारा।

अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते

Monday, February 27, 2006

गुड ओल्ड डेज

जुन्या दिवसाविषयी बोलायच म्हटल कि हल्ली "ओह!ते जुने सोनेरी दिवस, असे उसासेच ऐकायला मिळतात.मग मी ही त्याच सुरात सुर मिळवुन "अरेरे! गेले ते दिवस"अशी हळहळ व्यक्त करुन सुस्कारे टाकीत असते.सगळ इतक झपाट्यान बदलत चाललय कि माझे लहानपणाचे दिवस आता "जुने दिवसच" म्हणावे लागनार. पण खरच ते जुने दिवस इतके सुंदर होते ?आताच्या सोई,ऐषआराम कुठ होते तेव्हा?मग तरीही "गेले ते चांगले दिवस" अस का म्हणायच?
म्हणजे मला आठवत लहानपणी आमच्याकडे car नव्हती.पप्पाच्या officeच्या गाडीमध्ये आम्हाला अगदी कधीतरीच बसायला मिळायच. मुल शाळेत चालतच जायची. आम्ही मैत्रीणी एकमेकीच्या उखळ्या पाखळ्या काढत,कधी भांडण करीत,कधी हातात हात गुंफ़ुन शाळेत जायचो. मुलगे बरेचवेळा टोळक्या टोळक्यान जात. टोळक्यातला एक मुलगा जो सहसा शिष्ट leader असे तो असा उलटा इतर मुलांकडे बघत त्याना काहीतरी महत्वाच सांगत जात असे.सहसा उलट चालनाऱ्या मुलाकडे त्या दिवशीची एकदम important बातमी असे. आम्हाला काही केल्या तो ती बातमी सांगत नसे.
शाळेजवळच्या दुकानात लाल,नारिंगी,पिवळ्या अशा गोळ्यांच्या बाटल्याची रांग असायची.मीठ लावलेले चिंचेचे गोळे ,कच्ची करवंद ,आवळे ,कैरीच्या तिखट्मीठ लावलेल्या फ़ोडी,कच्चे पेरु असा आम्हाला खर्चाला भाग पाडनारा menu असे.डबा कितीही चांगला असला तरी हे पदार्थ खाल्ल्याशिवाय पोट भरतच नसे.
दप्तराचा रंग सहसा तो खाकीच असायचा.कंपास सहसा camel किंवा सोनिचा असे.दररोज नविन पेन घेतल तरी ते हरवायचच. शाईच पेन बरेचदा गळक असायच.हीरो कंपनीच पेन मात्र मस्त होत अगदी.गुलाबी रंगाच्या सुगंधी खोडरबरमुळ कंपासला मस्त वास येई . शिसपेन्सिलीचा वापर शार्पनर मध्ये घालुन टोके काढुन संपवण्यासाठी जास्त होत असे. पुस्तकाना नविन खाकी कव्हर घालुन, नव्या पुस्तकांचा तो करकरीत वास हुंगायला फ़ारच छान वाटे.पण नंतर त्यातल्या बऱ्याच फोटोना दाढीमिशा काढुन इतिहास बदलण्याच पातक आमच्याकडुन होत असे.मला २९च्या पाढ्याने तर फ़ार दमवल होत.घटक चाचणी ही दर महिन्याला त्रास देण्यासाठीच काढली असावी अशी आमची ठाम समजुत होती.

बाजारात TV आलेला पण घरी अजुन TV आणला नव्हता .radio वर सकाळी बातम्या लागत आणि तेव्हा ७ वाजता आम्हाला उठावच लागे.पण खुन,दरोडे,अतीरेकी हल्ला अशा रंजन करणाऱ्या बातम्या जरा कमीच.अगदीच साध्या गव्हाचे क्विंटल ला भाव वाढले,मुख्यंमत्र्याच आश्व्वासन अशा निरुपद्रवी बातम्या ऐकाव्या लागत. रात्री रेडीओवर नाटक असे.खरतर तेव्हा तो traffic updates आणि music साठी नव्हे तर मनोरंजनाच साधन म्हणुण जास्त वापरला जात असे.
आमच्या छोट्या गावात नगरवाचनालयात भरपुर पुस्तक वाचायला मिळायची.तीथल्या बायका जरा खडुस होत्या.पण comics,चिंगी,खडकावरचा अंकुर,गोट्या तीथल्या एका कोपऱ्यात तासनतास बसुन वाचण्यात मी गढुन जात असे.
चित्रपट बघायला टॉकीजमध्ये आम्ही सहकुंटुब जायचो. तीथले popcorn उर्फ़ लाह्या(हे आईच मत होत) हे मुख्य आकर्षण होत.आम्ही पिक्चरच्या आधीची vicco ची जाहिरात सुद्धा चुकवीत नसु.
थोड कळु लागल्यावर घरी TV आला . TV वर एकच channel लागायच.त्यामुळ दुरदर्शनवर जे काही दाखवतील ते निमुटपणे पहावच लागे. सुट्टीत भाड्यान vcr आणुन त्यावर ही पिक्चर बघितले जात. TV आणल्यावरचे दिवस मात्र अगदीच रंगिबेरंगी,सोनेरी होते.
मग एक दिवस आम्ही नंबर लावुन चकचकित निळ्या रंगाची मारुती ८०० घेतली. तेव्हा कारला आताच्या कार सारख auto-transmission,air conditioner वगैरे काही नव्हत. आम्हाला एवढ्याशा त्या गावात फ़ारस कुठ जायच असायचच नाही.आम्ही मग उगाचच कुठतरी खास car ride म्हणुन जायचो. गाडीच्या काचा खाली करुन ,भन्नाट वारा खात कुठतरी फ़िरुन यायचो. घरात एकच सायकल बरेच दिवस होती. तीच मी आणि बहिण वाटुन वापरायचो. नंतर जुनिअर college मध्ये लुना आणल्यावर बरेच दिवस मी ,आईला कधीही सामान पाहिजे असल कि paddle मारुन तयारच असे.पण बरेचदा लुना चढावर चढतच नसे. college मधली मुल फ़िदिफ़िदी हसत आणि मगच मदत करत.
video gamesवगैरे आम्हाला बरेच दिवस माहितच नव्हतं.घरात पत्ते,सापशिडी,caram असे बैठे खेळ खेळत असु.बाहेर मैदानात लपाछपी ,लगोरी ,आबाधबी ,जिबल्या असे खेळ असत.सारख "TimePlease" केल कि बाद व्हाव लागे.
AC तर फ़क्त हॉटेल मध्ये नाहीतर dr च्या रुम मध्ये असतो अस आम्हाला वाटायच. मे मधला उन्हाळा हैरान करुन टाकी.पण माठातल्या थंडगार वाळा घातलेल्या पाण्यान सारी तहान भागे. कधी कधी गाड्यावर बर्फ़ाचा गोळा दुपारी खायला मिळे.ice cream च मशिन चुलत भावंड सुट्टीत आले कि आणल जाई. कडेला बर्फ़ाचा चुरा आणि मिठ ठासुन भरुन , मधल्या डब्यात ice cream च सगळ साहित्य घालुन आळिपाळिने एकजण त्या यंत्राचा दांडा फ़िरवीत बसे. हात दुखुन येत.पण त्या icecream ची चव वर्षभर जीभेवर रेंगाळत राही. नंतर फ़्रिज आल्यावर आई बरेचदा ice cream घरीच करीत असे.त्यामुळ ac त काय 'सुख' असत त्याचा विचार ही कधी मनातच आला नाही.
थोडे दिवसानी हळु हळु आमच्या लहानशा शहरात ही ac दुकान.चित्रपट ग्रुह सुरु होवु लागली.आम्हाला तिथल्या फ़्रिज सारख्या हवेच फ़ार अप्रुप वाटे. गावात पहिली चार मजली इमारत झाली .तिथ गावातली पहिली Lift बसवली गेली.त्या Lift ला एक मिशिवाला liftman होता. तो आम्हा लहान मुलाना Lift च्या बटनाना हात लावु देत नसे.आम्हाला जरा रागच येई मग त्याचा.
गंम्मत म्हणजे घरातल कोण कुठे आहे हे आईला घरातुनच cell phone शिवायही बरोबर कळे. w/e ला सगळे मिळुन तलावावर नाहीतर बागेत फ़िरायला जात असु. कधीकधी लहान plastic ball,कागदी चक्र,पतंग वगैरेची खरेदीही होई. हे बरचस आईच्या mood वर अवलंबुन असे. म्हणजे 'शहाण्यासारख' वागल तरच. माझे chances त्यामुळ बरेचवेळा हुकत.
परवा घरी गेल्यावर microwave नसल्यामुळ आईची गैरसोय होते अस वाटल.त्यात भाज्या,खिचडी,लाडु सगळं करता येत अस तीला सांगितल्यावर;तीन चक्क ignore केल आणि gasवर भाकरी उलटली. तीच काहीच अडत नव्हत microwaveशिवाय. आपल्याला मात्र AC,लिफ़्ट,कार,cell phone यापैकी काहीही बंद पडल तर, जगबुडीच होईल असच आज काल वाटत. 'अस का?' या प्रश्नाला ,"सवय झाली "हे उत्तरही तयार असत.
खरतर जीवन अगदीच साधं आणि सरळ होत त्यावेळी.आताच्या लहान मुलाना मात्र वाटेल cabel TV,iPOD शिवाय जगु तरी कशी शकत होती माणस?अलिकडे मलाही अवघडच प्रश्न वाटतो हा. खरच त्या जुन्या,सुंदर,निरागस दिवसात ह्या वस्तु शिवाय कसे जगु शकलो आपण?काहीच नसतानाही इतके आनंदी कसे काय होतो आपण?

Sunday, February 12, 2006

फरगेट इट

oraganisation करण मला फ़ार आवडत. माझ घर नेहमीच नीट्नेटक आवरलेल असत. सार छान रचायच,त्याच grouping करायच, जुन्या वस्तु वेळच्या वेळी फ़ेकुण द्यायच्या,निरुपयोगी वस्तुचा जास्त मोह न करता त्यांची अडगळ वाढु द्यायची नाही हे तर मी नेहमीच करीत असते. शेल्फ़वर सुरेख रचलेली पुस्तक, pantry मध्ये ओळीन मांडलेल्या बरण्या बघायला मला फ़ार आवडत .
यासाठी माझा आटोकाट प्रयत्न चालु असतो.हव्या त्या वस्तु हव्या तेव्हा पटकन मिळव्यात हा त्या मागचा हेतु. पण माझ्या विसराळु पणामुळ यातल्या कशाचाच उपयोग होत नाही.
म्हणजे मला हव्या तेव्हा घराच्या किल्ल्या कधीच सापडत नाहीत. आठवणीन इस्त्री करुन ठेवलेले कपडे ऐनवेळी मी कुठल्या कप्प्यात ठेवलेत ते विसरते.लोकांची नाव विसरते,तारखांचे तर नेहमीच घोळ होत असतात.या सर्वाहुन कमी म्हणुण कि काय अलिकडे मी माझा घरचा फ़ोन नंबर ही विसरते.
babies R us चा counter. माझा नंबर येतो. salesgirl नेहमीप्रमाणे फ़ोन नंबर विचारते. मी स्म्रुतीला ताण देवुन तो आठवायचा प्रयत्न करत असते. मला माहित असत याचा काही उपयोग होणार नाही पण तरिही लाजेखातर मला हे नाटक करावच लागत. शेवती नाईलाजस्तव ओशाळवाणं हसत मी तीला नंबर लक्षात नाही अस सांगुन टाकते. ती , मी खोट बोलती आहे अस वाटुन, रागा रागानच मग बिलाचे पुढचे सोपस्कार वैगरे करते. सगळ आटोपुन मी पुढ येते तोवर ती परत मला बोलावुन माझ credit card माझ्या हातात देते. आता रागाची जागा माझ्याविषयीच्या दयेन आणि प्रश्नार्थक(why don't u see the dr?) चेहऱ्यान घेतलेली असते.
हे आता नेहमीचच झालय. अलिकडे सतत मी काहीतरी विसरत असते. आणि लोक मला असे काही look देत असतात कि आजकाल मग मी सरळ शरणागती पत्करुन आपण बावळट असल्याच मान्य करुन टाकते. पण ते तीतकच काही पुरेस नसत. सहानुभुतीसाठी मला त्याच बरोबर अत्यंत हुशार पण abscent minded ,बावळट, विसराळु प्रोफ़ेसर सारख ही वागाव लागत.फ़क्त या प्रोफ़ेसर ला कुठ् शिकवायच नसत एवढचं.
हा विसराळु पणा सुधारण्यासाठी पुस्तक वाचली.योगा करुन पाहील. अगदी शंखपुष्पी ही घेवुन झाल.पण कशाचाच उपयोग होत नाही.
मग जरा वेगळ्या प्रकारे म्हणजे list तयार करण. मोठ्या अक्षरात fridge वर लिहिण. छोट्या stick notes लावणं,diary मध्ये नोंद करण.इत्यादी करुन पाहिल.पण "i forgot" ही अक्षर मला अगदी fevicol न चिकटल्यासारखी चिकटली आहेत.stove वर ठेवलेला चहा,dr च्या appoitntmets ,फ़ोन numbers, password,billing च्या last dates ,पुस्तक परत करण्याच्या तारखा अगदी सगळ माझ्या लक्षातुन जात. मग fine भरताना स्वतावरच हताशपणे वैतागायच हे तर नेहमीचच.
"savings" करण्यासाठी grocery ला जाण्यापुर्वी list करावी" मी नुकतच मी वाचलेले असत.bank balance फ़ारच कमी दीसत असतो त्यामुळ मी हे implement करायच ठरवते. पण हाय रे कर्मा! बरेच दिवस मी ती list करायला विसरते.केल्यावर ती list न्यायला विसरते आणि मग नंतर जर समजा ती list नेलीच तर पहायला विसरते. या सगळ्यातुन भरपुर शिल्लक असलेल्या मैद्यात आणखी भर पडते आणि मला हव असलेलं तांदळाच पीठ दुकानातच रहात.मग परत store मध्ये जाण आलचं. पण दोन तीन दिवसानी pantry मधल्या सगळ्यात वरच्या कप्प्यात तांदळाच्या पीठाचे दोन pack मिळतात. मी मग फ़क्त थयथयाट करायच तेव्हढच राहीलेल असतं.
बरेचवेळा form भरताना घराचा पत्ता ,रस्त्याचा number,pin code यातल काहीतरी मी विसरत असतेच.माझा ssn तर अजुनही मला पाठ नाही.नशिब एवढच कि मी अजुन लोकाचे चेहरे विसरले नाहीत. नाहीतर थोडे दीवसाने "मै कहां हुं?" असे प्रश्न विचारावे लागणार.पण तो दिवसही दुर नाही.फ़ोन करुन ओळखलस का? अस विचारनाऱ्या लोकामुळ तर माझी फ़ारच पंचायत होते. चेहरा ओळखिचा वाटत असतो पण नाव आठवत नाही आणि समोरची व्यक्ती तर जन्मोजन्मीच नात असल्यासरख माझ्याशी बोलत असते. अशावेळी तर मला हुशारीन वागाव लागतं.सासरी असले तर फ़ारच.नाहीतर हमखास मी जावेच्या बहिणीच्या नवऱ्याला तीचा भाऊ केलेल असतं.
महत्वाच्या वस्तु तर मी अशा safe ठिकानी ठेवलेल्या असतात कि त्या फ़क्त मलाच सापडु शकतात. पण बरेचवेळ ती मिळेपर्यंत वेळ निघुन गेलेली असते.सापडुन त्याचा उपयोगही नसतो.
रस्ते विसरायचे हे तर अगदी रोजचच झालेल असत. दवाखान्याची appointment असते. लक्षात नसतच. नवरा अगदी ऐनवेळी आठवण करुन देतो. पण भगवंता! नेहमी प्रमाणे मी रस्ता विसरते."इथेच तर होत त्यावेळी. इथुन left घ्यायचा, मग right मग दोन blocks झाले की यायलाच हवी ती building." पण ती building कधिच येत नाही कारण त्यावेळी खर तर मी त्या building च्या विरुद्ध दिशेला १० blocks असते.
ह्या सगळ्याचा मला इतकाच उपयोग होतो कि माणसावर माझा अतिशय विश्वास बसलाय. मला कुणी लुबाडणार नाही सगळी लोक प्रामाणीक आहेत अस आपल मला वाटत.वाईटातुन चांगल ते अस निघतं. कारण शंभरदा मी विसरलेल्या वस्तु मला लोकानी परत केल्या आहेत.
एकदा carpet बघायला गेलेले; तेव्हा एकावर एकावर carpet टाकता टाकता माझी purse त्या ढिगाच्या आतच राहीली. दुकानापासुन साधारण २५ miles आल्यवर अर्थातच त्या purse ची आठवण आली. ती तशीच्या तशी मिळाली हे सांगायलाच नको.भारतात रिक्षात विसरलेली bag,tailor कड शिवायला टाकलेला dress(जो १० दा फ़ेऱ्या मारल्यानंतर माझ्या स्मरणातुन जातो) ,दुकानदाराकडुन परत घ्यायचे पैसे अस बरच काही मला अनोळखी दयाळु लोकानी आणुन दिलेल आहे.
गंम्मत म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी मी विसरते पण मी माझ्या मुलीची कुठलीच गोष्ट कधीच विसरत नाही. तारखेच्या बाबतीत इतके घोळ घालनाऱ्या मला ,ती पहिल्यादा कधी पालथी पडलेली, तीन पहिल smile कधी केल, तीचा पहिला शब्द कुठला होता, तीन पहिल्यान्दा मम्मा अस कधी म्हटलेल
हे सगळ चांगलच लक्षात आहे. आणि ते कधी मी विसरीन असही मला वाटत नाही.
तीला कधी काय लागत असत ते ही माझ्या बरोबर लक्षात असत.तीला माझ्या hugs आणि kisses ची भुक आहे कि cereal ची हे मला बरोबर कळत अगदी.मुलीचीच नव्हे तर माझ्या इतर जवळच्या माणसांच्या आवडीनीवडी, गरजा मला नेहमीच लक्षात रहातात.त्यासाठी मला reminder टाकायची गरज पडत नाही.त्याना हव तेव्हा हव तस सगळ माझ्या लक्षात असतं.
बहुदा, वरुन जरी मी organised असले तरी आतुन जरा अव्यवस्थितच आहे.त्यात कामाच्या इतक्या गर्दीतुन काही लक्षात ठेवाव तर वेळ तरी कुठं असतो ? मन अगदी नीटनेटक आवाराव,त्यातल्या विचारांना नीट संगतवार रचुन ठेवाव अस मला जमतच नाही.जुन्या आठवणीचा,विचारांचा त्याग करायचा,नको असलेले उपयोगी, नसलेले विचार फ़ेकुन द्यायचे हे नेहमीच अशक्य वाटलय मला.मग सार कुठतरी असेच भरकटत जात. मला आवरताही येवु नये एवढा पसारा होतो. एवढ्या सगळ्या विचारांच्या पसऱ्यातुन नेमक काय हव ते शोधुन काढण जरा कठीणच जात. आणि मग मी असच विसरत रहाते.
पण मग आवरायचा कंटाळाच करते मी. माझ्या माणसांच्या पुरत या सगळ्या पसाऱ्यात संगतवार लावलेल अगदी oraganised शेल्फ़ आहे. मला लगेच त्यांना हव असेलेल सापडत . मग बाकीच सार विसरल तर काय बिघडल?
(अरे देवा ! पण आता हे पोस्ट कस करु? कुठल्या नावान? माझ्या blog च नाव काय होत?आणि password?)

Tuesday, February 07, 2006

स्वीट थर्टी

आता असं समोरच्या खिडकीतुन दिसणाया तळ्याकड मी पहात बसले आहे.बदकाचा कळप लुटूलुटु चालला आहे.मी त्यात मन रमवण्याचा उगाचच प्रयत्न करत बसली आहे. माझ्या हातात नुकतच नवऱ्यान anniversary निम्मित अतिशय प्रेमान(?) शक्य तीतक्या नीरागसतेचा आव आणत दिलेला anti aging face cream चा "खास ३० वया नंतर साठी" अस label असलेला डबा आहे.गेली अनेक दिवस माझी तिशी हाकेच्या अंतरावर आली आहे ह्याची जाणिव करुन देण्यात येत आहे. या जाणिवांचा हा डबा म्हणजे एक प्रतीक आहे. ही जाणिव करुन देणाऱ्यात अगदी आईपासुन सारेच सामिल आहेत.
आता ३० गाठण मलाही ही फ़ार मोठ task वाटायला लागल आहे. इतर २९ वाढदीवसाचं स्वागत जाणत्या अजाणत्या वयात ज्या आनंदान केल होत तेच माझ मन ३० व्या वाढदीवसाच स्वागत करायला नाखुषच आहे.अगदी friends मधल्या रचेल सारख.
हा कलर चांगला दिसणार नाही तिशी नन्तर. ही style 30 नंतर चांगली दिसते. हे, हे शोभत नाही आता. आता heart ची काळजी घेतली पाहिजे.खाण्यात बदल घडवले पाहिजेत.चांगल व्याज मिळणारी गुंतवणुक वैगरे.असंख्य सल्ले,विचार नुस्ते येवुन थडकत आहेत माझ्यावर.
मला कळत नाही वयाप्रमाणे वागायच म्हणजे नेमक आता कस? १६ व्या वर्षी गाढव ही सुंदर दिसत म्हणतात.मग तेव्हा तरी निदान मी दिसत होते का सुंदर? कि तो केवळ मला त्यावेळी वाटणारा भास होता? १८ वयाच्या आधी मी अज्ञानी होते का? १८ व्या वर्षी मी लग्ना योग्य पण झाले म्हणजे नेमक काय झाल? (बहुदा मुद्दा सोडुन भांडता यायला लागल)आणि २१ व्या वर्षी लगेचच मी माझी राजकीय मत बनवली का?
बदल सहजासहजी स्विकारता येत नाहीत.पण तिशी गाठल्याने अस एवढ काय बदलणार आहे?
आज या वळणावर उभ असताना मला माहिती आहे कि मी बरच काही achieve केलय आणि बरच काही राहुनही गेलय .पण तरीही काहितरी न मिळाल्याची हुरहुर लागावी आणि त्यातच आपण गुरफ़टुन जाव अस माझ झालय.पुढ काय होईल याची उगाचच काळजी लागुन राहिली आहे.
खर आहे कि, आतापर्यतच आयुष्य एक विशिष्ट तालात, लयीत घडत आलेल आहे. म्हणजे शिक्षण, नोकरी, लग्न मुल .....पण मग पुढ काय?मला हव ते सार मिळालय का? जिथ मी असायला हवे होते तिथे मी आहे का?
आता मला गरज आहे "३० त कस वागाव?" "३० मधल्या यशाचा महामंत्र" अशा पुस्तकाची. पण गरज असताना एकही पुस्तक सापडत नाही.
अलिप्त होवुन मागे वळुन बघीतल कि आपण घेतलेले निर्णय योग्य कि अयोग्य होते यांचा मनामध्ये debate सुरु होतो.चांगल काही हातुन घडलच नाही अस वाटत.भरलेल तळ्ही रित झाल्याचा भास होतो.उगाचच आईच कधितरी मन दुखावल्याच आठवत रहात. अपराधी भावनेन मन ग्रासत!!
कित्येक चुका,घेतलेले चुकीचे निर्णय सभोवतली फ़ेर धरुन नाचायला लागतात. आणि वाटत पण खरच, आपण काही वेगळ केल असत?वेगळ्या वाटाची निवड केली असती का?पण त्याच उत्तर 'नाही' असच येत रहात. त्या त्या वयाला अनुसरुनच आपण वागत असतो. वेगवेगळ्या अनुभवातुन थोड शहाणपण येत जात, आणि मग मत आणि बरेचदा तत्व ही अशीच बदलत जातात.priorities change होत रहातात.
भोवतालच्या बदलत्या समिकरणाबरोबर जुळवुन घेताना आपल्या पीढीची खरतर थोडी दमछाकच होत आहे.compitionमध्ये टिकण्यासाठी चांगल शिक्षण,नंतर नोकरी,परदेशवारी,मग pramotions ,लग्न,घर,उत्तम कार,मुल आणि हे सगळ ३० च्या आत जमवण अस सरळ सरळ आपल्या पिढीन ग्रुहित धरलय.आणि येवढ सगळ करुनही कशाचीच शाश्वती नाही.
आपल्याकडे थांबायला वेळ नाही.पुर्वीच्या लोकांसाठी जी स्वप्न होती ती आता आपल्यासाठी आवश्यक गोष्ट बनली आहे.जी गाडी घेण्यासाठी माझ्या वडिलाना त्यांच्या ५२ वयापर्यंत थांबाव लागलेल ती आताचा मला अगदी सहजपणे घेता येते.पण मग त्यात गम्मत वाटत नाही. म्हणुन मग हे अस वयाच बंधन घालुन घ्यायच.३० वय म्हणुणच मग अस important ठरत. स्वता कडुन स्वताच्याच अपेक्षाच ओझ बाळगणार.
त्या त्या वयापर्यंत काय मिळवल पाहिजे याचे जणु नियमच तयार केलेत आपण . यशस्वी, अयशस्वी, हुशार, great श्रीमंत इ.इ. असे निरनिराळे शिक्के आपण मिरवीत रहातो.माझे आइवडिल ३०च्या आत सगळ न मिळवुनही सुखी होते.त्यांना कुणीच अपयशाच लेबल चिकटवल नव्हत.खर बघायाला गेल तर कुणीच याचा हिशोब मांडत नव्हत.
आपल्यासमोर मात्र खूप choices आहेत. बदलत्या economy मुळ अंगावर येणारी, न पेलणारी जडशीळ अशी challenges आहेत.आणि वयाची बंधनही.
आयुष्य मग फ़ार complicated प्रश्नांच जाळच वाटायला लागत मला.इतके दिवस मला या विचाराची लाज वाटायची.मन खंतावायच.वाढत्या वयाची इतकी भिती मला का वाटते. माझ्या या दुबळेपणाचा राग ही यायचा.पण मग ते तेवढ्या पुरत असत.
all appears to change when we change हे कुठतरी वाचलेल मला स्मरत.सगळयाच प्रश्नाची नाहीतरी कुठ उत्तर असतात?. आणि सगळच हव तस घडतही नसत. गुढ अज्ञाताच्या दिशेन जायच आणि ती उत्तर शोधण्याचा जमेल तसा प्रयत्न करायच मी ठरवते. मग मी माझ्या तिशीला ला जिथ असायला पाहिजे तिथ नसले म्हणुण काय झाल? आणि कदाचित भविष्यकाळात येणाया त्या त्या वयाच्या टप्प्यावर मी नसेनही रुढार्थान यशस्वी. पण म्हणुन काही फ़ारस बिघडणार नाही.सगळ्याचेच plans change होत रहातात.नियम मोडतात,बदलतात.शिक्के फ़िकट होत जातात. शेवटी प्रवास कसा केला हे मह्त्वाच.
आता नाही वाटत तितकी भीती भविष्याची. आणि तिशी ची ही . जगण्याची अनिवार उर्मी दाटुन येते. असंख्य करायच्या गोष्टीची यादी समोर तयार होते. नविन गोल्स सेट होतात. नविन challenges माझ्या भोवती रुंजी घालतात. मी थोड तळ्याकाठी विसावते आणि मग पुन्हा आनंदान चालतच रहाते.जमेल तस गुणासकट, दोषासह जगायला सुरुवात करते.विस्कटलेली लय परत पुर्वी सारखी साधत जाते.
शेवटी आयुष्य काही नेहमीच सुरेख रंगीबेरंगी वेष्टणात गुंडाळलेल,नीटनेटक birth day present असणार नाही. होय ना?

Sunday, January 22, 2006

मेमरी स्टिक

परवा अचानक माझा camera बंद पडला . काय झाल म्हणुन बघायला गेले तर memory stick formatting error. वीकएन्ड ला काढलेले लेकीचे फोटॊ गेले म्हणुन हळहळत बसलेले. तेव्हढ्यात एकदम ल़क्षात आल कि गेल्या महिन्या पासुनचे photo मी कुठेच साठवुन ठेवले नाहित. म्हणजे त्या मेमरी स्टिक बरोबर गेल्या जवळ जवळ दिड महिन्यातले सारे क्षण पुसुन गेले म्हणायचे .
जन्मा पासुन माझ्या १८ महिन्याच्या लेकिचे जवळ जवळ प्रत्येक दिवसाचे फोटॊ आहेत. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता. पण आता अचानक लक्षात आल की december मधला तीचा एकही फोटो माझ्याकडे नाही.म्हणजे तीन १७ महीन्याचा milestone पुर्ण केल्याचा पुरावा कागदोपत्री माझ्याकडे नसणार होता.
सार सार घट्ट बांधुन ठेवन्याच्या प्रयत्नात अचानक माझ्या मुठीतुन वाळु निसटुन गेल्यासारख वाटल.क्षण जपुन ठेवन्याचा आमच्या पिढीचा किती हा आटोकाट प्रयत्न.!
तस बघायला गेल तर माझ्या पिढीतल्या कित्येक मुलांचे लहानपणी असे दररोज फोटॊ काढले गेले असतील का? मग मी का इतक अस्वस्थ व्हाव ?
माझा मेंदु मात्र अजुन format झाला नव्हता बहुदा.कारण माझ्या नजरेसमोर stick मध्ये टिपलेले सारे प्रसंग रीळा सारखे पुढे सरकत होते.
सोनेरी उन्हात सकाळी आपल्या पाणीदार डोळ्यानी माझ्या घराच्या गच्चीतुन सुर्या कडे पहाण्याचा प्रयत्न करनारी, daddy च्या हातात आपले इवलसे गोरेपान हात गुंफ़ुन morning walk जाणारी माझी सोनुली. peak boo करुन मला घाबरवणाऱ्या तीचा photo तर अगदी धांदल करुन टिपला होता मी .या महिन्यात नविन दात आल्यानंतरचा तीचा फोटो .
तीच्या nursery तल्या मोठ्या खिडकीतुन दीसणाऱ्या त्या ध्यानस्थ oak व्रुक्षावरुन उडणाया birdi कडे बघुन हरखणारी,आणि त्या खिडकीशीच बसुन आपल्या चित्रविचित्र भाषेत पुस्तक वाचणारी ती.सार काही त्या memory stick मध्ये होत.
मी driving ला बसल्यावर उगाचच(?) फ़िदीफ़िदी हसणारी ,चित्रविचित्र रंगानी रंगुन जावुन वर आणि daddy ला मिठी मारुन tide चा business वाढवणारी माझी लेक छायाचित्रात बंदिस्त करण खरतर कठीणच.पण प्रयत्न करुन सार जमवलेल.यातला खरतर कुठलाच moment delete होन्यासारखा नव्हताच.
माझ्या शहरात december मध्ये थंडी भरपुर असली तरी बर्फ़ पडत नाही. आणि या वर्षी तर बरेच वेळा वातावरण इतक उबदार होत.सारा december महिना christamas च्या लाल हिरव्या रंगानी रंगलेला आणि सांताक्लाज आजोबांच्या प्रेमळ स्पर्शान अधिकच प्रेमळ भासणरा. christamas tree वरच्या छोटया छोट्या लाइटसच्या सुंदर प्रकाशात तीच्या चेहयावर फ़ुललेले लोभस भाव तर मी अगदी अधाशीपणान बंदिस्त केलेले. सार कस माझ्या मनात साठवलेल आहे.पण ते सार त्या दळभद्री memory stick मुळे गेल होत.मला फ़ार फ़ार स्वताचा राग येत होता.(आणि पर्यायान नवऱ्याचा.तो तर इतर तमाम बायकांप्रमाणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे. काहीही झाल तरी नवऱ्याला जबाबदार धरायच.)
अगदी सजिव जिवंत अस सार जवळ असतानाही निर्जीव कागदावर उमटणारी ती छायाचित्र मला हवीच होती.अस का?कालानुरुप माझ्या मनातली आता सजीव वाटणारी सारी चित्र कदाचित पुसट होत जातील या भितीने?उलटणाऱ्या प्रत्येक दिवसागणीक बदलणारी माझी मुलगी आणखी अशी हजारो नवी रुपं, नवे रंग मला दाखवेल.आणि आता माझ्या मनात रेंगाळणाया या प्रसंगावर नवे क्षण overwrite होत रहातील. आणि तेच माझ्या मनातली जागा पटकावुन बसतील.
म्हणजे २००५ च्या december च्या सोनेरी सकाळी आणि रुपेरी रात्रीत ती कशी दीसत होती ते मला कदाचित स्म्रुती ला ताण देवुन आठवाव लागेल.कुठल्याच data recovery tool उपयोग होणार नव्हता मग.
नाहीतरी आपल्या सर्वानाच सोपी काम करायला आवडत. मग हे सारे हे अस क्लिष्ट लक्षात ठेवण्याऐवजी वाढदीवसाचे, पहिल्यांदा school मध्ये जाण्याचे,vacation चे आपल्या द्रुष्टीने आयुष्यातले मेजर ईव्हेन्ट्स ठरतात आणि तेच ल़क्षात ठेवले जातात.अगदी छोटी सुख, छोटे क्षण कित्येक वेळा अशीच वाया जातात.
इतके दिवस मला वाटायच माझ्याशिवाय ती राहुच शकत नाही. अर्थात अपवाद तीच्या daddy कडे सोडुन. पण ती daycare मध्ये जायला लागल्या पासुन तीथल्या teacher बरोबर , इतर दोस्ताबरोबर इतकी समरस होवुन जाते ना कि मी तीच्या लक्षात ही रहात नाही. हे accept करण जरा अवघडच गेल मला. म्हणजे चक्क थोडा जळकुटेपणा आला म्हणा ना माझ्या स्वभावात.
कुणीतरी तीच्या मायेच भागिदार होण मला जणु मान्यच नव्हत. त्यात ही मुल इतकी भरभर वाढतात ना!पाण्यावरच्या रांगोळी सारखी क्षणोक्षणी बदलत जातात . माझी मुलगीही इतकी लवकर मोठी होत चालली आहे कि सारेच क्षण काही मला असे घट्ट धरुन ठेवता येणार नाहीत. काळ उलटतच जाणार आणि क्षणही असेच हरवत जाणार.मुल अधिकाधिक स्वावलंबी होत जाणार.
पण ती घरी आली की आपल्या चिमुकल्या हाताचा माझ्या मानेभोवती घट्ट विळखा घालते आणि आपल्या चिमुखड्या अगम्य बोलात मला सार्‍या घडामोडी सांगते.माझा अहंभाव जरा सुखावतोच मग.
तशी हातातुन काहीतरी निसटन्याची भावना अजुनही मनात घर करुन आहेच. आणि december महीन्याचे photo हरवल्यावर तर ती अधिकच अधोरेखीत झाली.
पण सारच काही जस च्या तस जपुन ठेवता येणार नाही ह्याची जाणीव मात्र झाली आहे. प्रत्येक क्षण नवा,एकुलता एक आणि अगदी महत्वाचा अस म्हणुण जगायला लागल कि झाल.सार मनात मग साठतच जाईल. कदाचीत मग ते कधीच पुसल जाणार नाही. सारेच क्षण मग major events ठरतील.
म्हणुणच मी ठरवलय कालच्या पेक्षाही थोड जास्तच खेळायच तीच्याबरोबर. गाणी म्हणण, dance करणे , चित्र काढने हे तर या पुर्वी करितच होतो आम्ही ( म्हणजे मी आणि तीचा daddy )पण जमल तर वाळुचे किल्ले बांधायचे , पतंग उडवायचे,कागदी होड्या तयार करुन row row ur boat म्हणायच . रात्री storytime झाल्यावर झोपी गेलेल्या माझ्या सोनेरी परीचा चेहरा न्याहाळत अमंळ थोड जास्तच बसायच. peak boo खेळण्यासाठी घरात नवीन जागा शोधायच्या . शाबासकिच्या थापेन प्रफ़ुल्लित झालेल्या तीच्या चेहर्‍याहुन काही news paper,cnn , क च्या मालिका , idol महत्वाच नाही. कारण आजुबाजुला जगात काहीही घडत असल तरी एक गोष्ट मात्र नक्की , माझ्या जगात ती अशीच मोठी होत जाणार आहे. आणि ते थांबवण माझ्या हातात नाही.

Wednesday, January 18, 2006

सारे तिचेच होते

सारे तिचेच होते
सारे तिच्याचसाठी
हे चन्द्र सुर्य तारे होते तिच्याच पाठी
आम्हीही त्यात होतो
खोटे कशास बोला
त्याचीच ही कपाळी बारिक एक आठी
कविवर्य विन्दा करंदिकर