Sunday, March 19, 2006

गोधडी

बरेच दिवसापुर्वी गोधडीविषयी लिहुन ठेवलेल.
.....................................


काहीवेळा अवचित वाटेवरती भेटलेली अनोळखी माणस जुन्या काळातले काही संदर्भ आठवुन ओळखीची वाटु लागतात.वाटत ह्याना आपण भेटलेलो कधीतरी.
माझ्या क्विल्ट च्या weekend ला चालणाऱ्या क्लासटीचर मिशेलला पाहुन मला अशीच ओळखीची खुण भेटल्याचा आनंद झाला. स्वताच्या नातवंडाविषयी बोलताना तीचा फ़ुललेला चेहरा आणि दाटुन आलेले डोळे पाहुन क्षणभरच मला मिशेल नाही तर दुसरच कुणितरी असल्याचा भास झाला.जगाच्या पाठीवर कुठही गेल तर आजी अशीच असते का? माझ्या लेकीची आजी झाल्यापासुन माझी आई ही काहीशी वेगळीच भासते मला.

धावदोरा घालता घालता लक्षात आल गेल्या कित्येक दिवसात हे काम मी केल नाही तरीही टाके इतके सफ़ाईदार पडत होते. इतक्या दिवसानंतर सुद्धा जणु काही मी ते करायच कधी विसरलेलेच नव्हते. माझ्या आजीन दिलेल्या अगणित देण्यापैकी हे ही देण मी खोलवर कुठतरी बंदिस्त करुन ठेवल होत. कापडावर धावदोऱ्याचे बारीक ठिपके ,माझ्या घरासमोरच्या रांगोळीसारखे उमटत गेले.आणि आजीच्या आठवणीच्या रेशमी लड्या उलगडु लागल्या.

केळीच्या बागा आणि पानमळ्यामुळ संपन्न असलेल्या माझ्या आजीच्या गावात येताना शेतात बहुदा एक तरी मोर दिसायचाच, पण या सगळ्याहुनही ज्या ओढीन या गावात मी येत होते, मवु कापसासारख मुलायम अतरंग असलेल्या माझ्या आजीसाठी.

गावाच्या आतल्या बाजुला असलेल्या आमच्या भल्याथोरल्या दगडी घराच दुरुनच, उंच धुराड आणि कौल दिसु लागत.अगदी घराच्या समोर गेल तरच घराची भव्यता कळे. दडदड चढुन ३ पायऱ्या गेल कि सोपा,बैठी खोली त्यात मांडलेली पांढरीशुभ्र लोड तक्क्याची बैठक,मग भल थोरल मधल घर.आणि शेवटी आजीचा अखंड वावर असलेल ,लखलखित स्वयंपाकघर.

दुपारच्या अगदी शांत वेळी त्या दगडी घरात, डोळ्याच्या खाचा झालेली आजी तीची जुनी पत्र्याची ट्रंक काढून आतल्या घरात गोधड्या विणत बसलेली असायची.बाहेर उन्हाच्या रखरखाटान डॊळे दीपुन जायचे.पण माळीत मात्र त्या उन्हाची तीरिप सुद्धा जाणवायची नाही .

त्या ट्रंकेत चांदीचे बंदे रुपये ,कधीतरी वापरायच्या कपबशा,अत्तरदाणी,गुलाब जल,कात,रक्तचंदनाची बाहुली,वेखंड,जपाच्या माळा अस बरच काही किडुक मिडुक असायच .

घरी गे ल कि कधी एकदा ती ट्रंक उघडुन बघेन अस मला व्हायच.सगळ्याचा तो संमिश्र असा गंध मला मनापासुन आवडायचा.

गोधड्या विणत बसण हा आजीचा अगदी आवडता उद्योग. जुन्या डब्यात विणायच सामान जड लोखंडी कात्री,दोरे,सुया,टेप , शिसपेन्सिली अस बरच काही असायच.तुकडे बेतुन झाले की रंगसंगती साधुन तीच शिवण सुरु व्हायच.बरचसं काम अंदाजान. एकदा मनाजोगे तुकडे जोडुन झाले कि मग ती ते धावदोरा घालुन शिवायला सुरुवात करे.एकसारखा टाका घालायला तीनच तर मला शिकवलेलं.

ट्रंकेजवळच्या गाठोड्यात जुन्या कपड्याव्यतीरिक्त जरीचे परकर पोलक्याचे तुकडे,तीच्या वडीलानी दिलेली ली एकुलती एक खऱ्या चांदीची जरीची साडी अशा बऱ्याच प्रिय आठवणी होत्या.
आपला थरथरनारा हात त्यावर फ़िरवीताना तिच्या,डोळ्याच्या कडाना जमा झालेलं पाणी मी कित्येकदा पाहिल होत.

अगदी लहान असताना पोरक झालेल्या तीच्याजवळ या तुकड्याखेरिज भुतकाळाशी बांधुन ठेवणार काही नव्हतच.नकळतच प्रत्येक नविन तुकड्यासरशी नविन आठवण समोर यायची.मनाजोगत काम करण्याच्या नादात आजीही मनसोक्त बोलत राही.

पण थोड्याच वेळान उन्ह खाली यायची. धारेची वेळ झालेली असायची. गडी माणस यायला लागायची. इच्छा नसतानाही उठावच लागे तीला.

आमची जमीन भरपुर असल्यामुळ,घरी पुष्कळ धान्य येवुन पडायच. आजी वाटेकऱ्याच्या बायकांना हाताशी धरुन धान्याची साफ़सफ़ाइ करायची. मी जायचे तेव्हा आजी परड्यात कोथिंबीरीचा वाफ़ा तयार करायचा,घेवडा,वांगी तोडण यातल काहीतरी करीत असे.

गोळा केलेली फ़ळ, भाजी बरेचवेळा ती वाटुन टाकायची. आजोबाना ते आवडायच नाहे.आजीला व्यवहार कधीच जमला नाही.आजोबा स्वभावाने थोडे तुसडेच.वाईट अनुभवामुळ व्यवहारी बनलेल्या आजोबाना आजीच हे भावनाप्रधान वागण पसंद नसे.तीला बरच ऐकुन घ्याव लागे.अशावेळी वाद घालण्यापेक्षा ती गप्पच बसुन राही.पण तीचा मुळचा मदत करण्याच्या स्वभाव काही बदलत नसे.

आमच्या पाठिमागच्या खोलित हारीन लावलेली पिंप,पत्र्याचे डबे आणि एक मोठ थोरल शिसवी कपाट होत.मुरांबे,लोणची निगुतीन घालुन बरणी पांढऱ्या शुभ्र कापडान बांधुन ती आमची वाट पहात असायची. माझे सारे हट्ट पुरवणाऱ्या आजीला डबे शेवयान भरुन ठेवण्याच्या कामात माझी ढ्वळाढवळ चालायची नाही. मग मांडुन ठेवायच काम माझ्याकडे.मला वाटायच आजीन अगदी शाबासकी द्यावी मला. आजीच एक ठरलेल होत "बर झालय".

तीच्या द्रुष्टिन सगळ बरच असायच. फ़ार चांगल ,फ़ार वाईट अस काही नव्हतच.

आमच्या घराच्या मागे,परड्यात जाईचा एक विलक्षण देखणा पाना फ़ुलान बहरुन गेलेल असा वेल होता. त्याचा आखिव मांडव ही आजोबाची अगदी खासियत होती.संध्याकाळी त्यातली कळीन कळिन हलक्याशा झुळकेबरोबर उमलायची. आजी पहाटे उठायची आणि देवाच बारीक गुणगुणत फ़ुल तोडायची.
पहाटेच्या मंद वाऱ्यात डुलणाऱ्या त्या कळ्यामुळ सारा आसमंत, घर वासान दरवळुन जायचा.मला वाटायच तीन फ़ुल तोडण कधी थांबवुच नये.पण मग तीची मंदिरात जायची वेळ होत असायची.

मंदिरातल्या पुजेची घंटा वाजु लागे. मग मी तीच्या पुजेच्या सामानात लुडबुड करीत असे. तीच सारच काम इतक नीट नेटक आखिव रेखिव आणि सुंदर असायच.स्टीलच्या मध्यम डब्यात तांदुळ,निरांजन,अष्टगंध,आरतीसाठी चांदीची छोटी ताटली अस सगळ रचलेल असायच.मी फ़ुल डब्यात ठेवायचे.तोवर तीन फ़िकट पांढरट बारीक फ़ुलाफ़ुलाच्या print च पातळ नेसलेल असायच.आणि ती फ़णेरीपेटी समोर घेवुन बसे. अनेक उन्हाळे पाहीलेले तीचे काळे पांढरे केस तर मी लहान असल्यापसुन जसे च्या तसेच होते.बारीकसा अंबाडा घालुन झाला कि थोडस मेणाच बोट लावुन त्यावर ती कुंकु रेखी.

मग चंदनाचा वास असलेली पावडर ती फ़क्त मला लावण्यासाठी आणे.त्या पावडरीचा इतका सुरेख वास तीच्या पातळाला यायचा!
मंदिरात बाहेर भली मोठी सहाण आणि चंदनाच खोड होत. मी गंध उगाळायला घ्यायचे.ती सांगायचे "अगं, एकसारख फ़िरव. हाताला थोडी लय असुदे"

आजी मंदिरात ,देवाच्यासमोर खुप वेगळी भासायची. फ़ार फ़ार दुर गेल्यासारखी अनोळखी अशी.समईच्या मंद प्रकाशात तीच्या चेहऱ्यावरचे ते तृप्त भाव निरखायची सवयच लागलेली मला. देवाशी ती इतकी समरस होई कि समईच्या ज्योतीमधला आणि तीच्यातल फ़रकच नाहीसा होई.

देवाच इतक करुन तीला काय मिळवायच असायच?'मोक्ष' तीच ठरलेल उत्तर.मला वाटायच परमेश्वराच ती एवढ करते मग ती ही काहीच कस मागत नाही. माझ्या तर रोज देवाकडुन असंख्य मागण्या असत.

आजीच्या साध्या साध्या इच्छा सुद्धा कधी कधी अपुऱ्या राहुन जायच्या. पण ती तक्रार करायचीच नाही. कुणी तीच्या मनातल ओळखल नाही तर ती मनस्वी दुखी व्हायची. का कोण जाणे आजोबाना ते कधीच कळल नाही कि त्यानी कळुनही डोळे बंद करुन घेतले होते?. तीचे आणि आजोबांचे सुर जुळले नाहीत ते यामुळच.

रात्री आजी गोष्टी सांगायची बरेचदा.तीच्या गोष्टी मध्ये राजा,रानी,पऱ्या अगदीच नसायचे.तसले काही चमत्कार नसतातच असा तीच ठाम विश्वास होता.पुराणातल्या गोष्टी,बालपणीच्या आठवणी ऐकण्यासाठी मी ही मान डोलवायचे. रात्री आकाशातले तारे तीला अगदी अचुक ओळ्खता यायचे. मग कधी सप्तर्षीची ,तर कधी ध्रुवाची गोष्ट ऐकायला मिळे. नीरव शांततेची ती गुढ रात्र मग आणखीनच अदभुत आणि रम्य वाटु लागे.

माझ लग्न ठरल तेव्हा ती आमच्या घरी आली होती.त्या दिवशी तीच ते केविलवाण रुप मला अक्षरश: व्याकुळ करुन केल. ती फ़ार फ़ार एकटी झाल्यासारखी वाटली.
लग्न झाल्यावर तीच्याकडॆ गेल्यावर येताना तीन हातावर दही ठेवल आणि दह्याबरोबर एक गोधडी. त्या गो्धडीत मला ते परकर पोलक्याचे चंदेरी जरीचे तुकडॆ स्पष्ट दीसले. काही न बोलता आजीन माझ मस्तक हुंगल माझ्या कानशीलावरुन बोट फ़िरवली.माझ्या ह्र्दयात कालवाकालव झाली. मला वाटल ती माझा कायमचा निरोप तर घेत नाही ना? मन अगदी वाईट शंकानी डागाळुन गेल.मला तो क्षण जितका होईल तितका लांबवायचा होता.अस्वस्थ होवुन मी तीला गोधडी पुढच्यावेळी नेते अस सांगितल. नंतर जमलच नाही जायला.

आज, आजी गेली त्याला बरेच दिवस झाले आहेत. काही दिवसापुर्वी आजोबाही गेले. घर अगदीच रिकाम झाल.आता गावही खुप बदललय.ठरावीक एस्ट्याचे येणारे आवाज इतर असंख्य गाड्याच्या कोलाहलात हरवुन गेलेत.आणि त्या आवाजांचा वेध घेत चिमणीसारखी आमची वाट पहानारी आजी ही. घरी कुणितरी येवुन जावुन असायच पण ते भकास च झाल होत. मायेचा हात फ़िरवनार फ़ारस कुणी तीथे नव्हतच. कुणाला तितका वेळ ही नव्हता.

परवाच्या पावसात घराची एक बाजु संपुर्ण ढासलली. घर भिंतीवीना उघड पडल.पोरक तर ते आधिच झाल होत. नविन भिंत बांधुनही फ़ारसा उपयोग होणार नाही अस सगळ्याच मत झाल.पाउस सगळाच सपासप येत होता. आणि आला तरी त्याला अडवण्यासाठी कोणि नव्हतच तीथ. तिथ माझ जाण तसही थांबणारच होत.माझ्या मनातल 'आजीच घर' जसच्या तस जपण्यासाठी तर आता मी तीथे जाणारही नाही.

त्या गावातल्या धुळीन माखलेल्या पायवाटांवर गाईंच्या पायरवात, माझ्या पाउलखुणा उमटलेल्या असतीलही अजुन कुठतरी. कुणास ठाउक, कुणी सांगाव.पण ती पायवाटच आता मला अनोळखी वाटते. त्या पायवाटेवरच माझी वाट न पहाणार,ते पडलेल घर माझ नक्कीच नाही. मग त्या पाउलखुणा तरी कशाला शोधीत जायच? पण मागे रेंगाळणाऱ्या आठवणींची मोरपीस अशी कधीतरी अलगद गवसतात. माझ वेड मन अगदी सैरभर होवुन जातं.
इतक्या सुंदर क्षणांची साक्षीदार केलेल्या,भुतकाळातल्या याच मायेच्या धाग्यानीच तर घट्ट बांधुन ठेवलय मला माझ्या मातीशी.

आजीच्या असंख्य देण्यानी माझ आयुष्य विविध आकाराच्या,अनुरुप रंगाच्या,तलम तुकड्याच्या गोधडी सारख देखणं झालय. आणि आता त्याच संलग्न धाग्यानी माझ्या आईला आणि लेकीला जोडलय.मग एखाद्या दुपारी त्याही वीणतीलच मायेची ,सुखाची गोधडी .

क्लास संपला.मिशेलचे मी आभार मानले.

घरी,नव्यान तयार केलेल क्विल्ट निरखीत बसले होते.खिडकीतुन दिसणार निरभ्र मखमली आकाश ताऱ्यानी भरुन गेल होत. साऱ्या वातावरनात जाईचा सुगंध व्यापुन गेल्यासारखं वाटल.हातातल्या क्विल्टच्या उबदार आश्वासक मिठीन मन भरुन आल होत.नकळत डोळे पाणावले.
दुरवर कुठतरी मंदशी चंद्रज्योत क्षणभर चमकल्यासारखी झाली.क्षितिजावर सोनेरी चंदेरी जरीच्या प्रकाशकणाची उधळण झाली.मंद सुखकर अशी उबेची मीठी त्या चंद्रज्योतीची होती की हातातल्या क्विल्टची माझ मलाच उमगेनास झाल.
भारणाऱ्या त्या सुगंधाच्या सहवासात,लुकलुकणाऱ्या सात्वीक ,सोज्वळ नक्षत्राच्या साक्षीन मी मुकपणे तशीच बसुन राहीले.