Thursday, March 30, 2006

झाड आणि कर्तव्य

एक झाड होत. मुळ अगदी घट्ट रोवलेल. मजबुत बुंध्याच. वारा सुटला कि मजेत शिळ घालायच. हलायच डुलायच. वाऱ्याच्या मंद झुळकेसरशी गाणी गायच. हिरव्यागार पानानी लहडलेल्या त्याच्या फ़ांद्या फ़ाद्यातुन चैतन्य ओसंडायच. त्याच्या गर्द छायेखाली येणारे जाणारे पांथस्थ क्षणभर थबकायचे.तॄप्त होवुन नव्या दमान पुढची वाटचाल करायचे. पाखरानी झाडावर घरटी बांधली होती.त्यांच्या किलबिलाटान झाडही सुखावायच. मायाळू व्हायच.
आपल कर्तव्य व्यवस्थित बजावुन झाड साऱ्यानाच सुखी ठेवायच आणि स्वताही समाधानान जगायच.
अशीच बरीच वर्ष गेली. झाडाच्या छोट्याश्या जगात सारे एकमेकाला सांभाळुन घ्यायचे. झाडाकडुन सल्ला घ्यायचे.त्याच ऐकायचे.त्याच्या मतांचा आदर करायचे.
सार काही ठीक चालल होत.
अचानक एक दिवस झाडाला कंटाळाच येवु लागला.
"काही तरी वेगळ घडायला हव? या जगाच्या पलिकडॆही काहीतरी असेलच ना. तीकडे जायला हव. नविन पहायला हव. "त्याच्या मनात असंख्य उर्मी दाटुन आल्या होत्या.
त्यान देवाकडे मागणी केली.
"मला कंटाळा आलाय. माझ क्षितीज थोड विस्तारु दे. नव जग मला पाहुदे."
"हो. पण या जगापेक्षा निराळ जग तिकडे असणार आहे. हे लक्षात ठेव हं." देव म्हणाला.
"बघु दे तरी मला." झाडान उत्सुकतेन म्हटलं.
देवान झाडाच्या फ़ांद्या उंचच उंच नेल्या.
झाडान आता गगनाला गवसणी घातली होती.
सार जग त्याच्या नजरेच्या टप्प्यात आल होत.
अनेक प्रकारची नवनविन लोक त्याला दिसु लागली.
लोक इकडे तिकडे नुस्ती धावत होती.पण इकडच्या सारखी छोटी पायवाट तिकडे नव्हती. खुप मोठा रस्ता होता. सिग्नल होते. असंख्य मोटारी धावत होत्या.
वाहतुकीचे नियम काही जण पाळत होते आणि काही जण नाही.
"हे हे भयंकर आहे. अशी कशी लोक वागतात?नियम पाळा." झाडान मध्येच जावुन सांगण्याचा प्रयत्न केला.
काहीनी ऐकल. काहीनी नाही. झाड अगदी हताश होवुन गेल.
" नवनविन लोकोपयोगी शोध लावले पाहिजेत. नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. नुस्त शास्त्राच शिक्षण घेवुन उपयोगी नाही." झाड शाळांमध्ये जावुन ओरडु लागल.
काहीनी ऐकल. काहीनी नाही
"नोकरशहा भ्रष्टाचारी आहेत. त्यानी काम केली पाहिजेत.राजकारणी पैसे खातात." झाड त्रास करुन घेवु लागल.
"लोक संस्क्रुती जपत नाहीत. आपल्या भाषेचा अभिमान बाळगत नाहीत." झाड तक्रारींचा पाढाच वाचु लागल.
झाडाला जगात सगळ वाईटच दिसु लागल.आणि प्रत्येकान त्याला हव तस बदलाव अस त्याला वाटत होत. काही बदलले. काहीना झाडाच म्हणन मुळीच पटल नाही.
झाड उदास होवुन गेल .ते खंगु लागल. झुरु लागल.उपाशी राहु लागल.
त्याच स्वताकडे लक्षच नव्हत.त्याची पान गळु लागली. आल्यागेल्यान सावली देणार झाड आता ओकबोक झाल होत.
ते आपल सावली देण्याच कामच विसरुन गेल. वसंतात फ़ुलणारी फ़ुल यावेळी झाडावर फ़ुललीच नाहीत. निसर्ग नियमाप्रमाणे आता फ़ळांचा रुतु सुरु होणार होता......
पण जगाची चिंता करता करता झाड स्वताचे नियम विसरुनच गेल.
"देवा, देवा हे अस का? जग बदलत का नाही?लोक आदर्श का वागत नाहीत?स्वार्थीपणान दुसऱ्याचा विचार का करीत नाहीत?
आपली कर्तव्य पार का पाडीत नाहीत?हा अनाचार मला सहन होत नाही आता."झाड अगदी उद्विग्न होवुन गेल होत.
देवान मंद स्मित केल.
"असं. पण तु तरी तुझ कर्तव्य कुठ पार पाडलयस? इतरांना सुधारता सुधारता तु तुझ कर्तव्य विसरलास.नियम मोडलेस.
विश्वाची चिंता वाहता वाहता तु सावली द्यायच थांबवलस. तक्रारी करता करता वसंत आला आणि गेला सुदधा .तुला कळलही नाही.तुझ्या आसऱ्यावर जगणाऱ्या पाखरांना तु विसरला नाहीस?"
झाड अगदी शरमुन गेल.देवान झाडाला कुरवाळल.
"हे बघ!आता जगाच्या तक्रारी करण सोड.तुझं काम अगोदर नीट पार पाड.तुझ्या अंगावर फ़ुल,फ़ळ फ़ुलु देत.जगाची चिंता करताना तुझ कर्तव्य चुकवु नकोस."
झाडाला आपली चुक उमगली.त्यान वाळलेली पान झटकली.मुळ अगदी तहानलेली होती. इतके दिवस त्यांची अगदी आबाळच झाली होती. अन्न पाण्यान आता ते पुर्वीसारखच हिरवगर्द होवुन गेल. सावली देण्याच आपल कर्तव्य पार पाडु लागल.त्याच्या अंगाखांद्यावर पाखरांनी पुन्हा आश्रय घेतला.झाड कौतुकान त्यांची किलबिल ऐकु लागल.
जग सुंदर करण्यासाठी आपला खारीचा हातभार लावु लागल.
झाडावर फ़ुल परत उमलली. फ़ळ धरु लागली.ते आपल्या कर्तव्यात निमग्न होवुन गेल. विश्वाची चिंता वहायच काम त्यान देवावर सोपवल आणि ते सुखान मार्गक्रमण करु लागल.

5 comments:

Nandan said...

छान लेख. आपल्याभवती अशी "खोड" असणारी झाडे सापडतात. :-)

Pawan said...

दुसऱ्याच्या कामात लक्ष घालण्यापेक्षा प्रत्येकाने आपापले कार्य व्यवस्थित पार पाडले तर जग कसे सुरळीत चालेल!

Vishal said...

लेख साध्या गोष्टीत बरंच काही सांगून जातो. आवडला.

Rga said...

धन्यवाद वाचल्याबद्दल आणि धन्यवाद अभिप्राय लिहिल्याबद्दल:)

शैलेश श. खांडेकर said...

आशयघन लेख! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.