Saturday, March 31, 2012

विरघळणारे क्षण

बरेच दिवसात काही लिहिल नाही. काही सुचलंच नाही . काल मैत्रिणीशी बोलताना लक्षात आल कि गेल्या वर्षात "गोष्टी" लिहायला सुचल्या नसल्या तरी पुष्कळ नवीन गोष्टी शिकल्या व केल्या जरुर.

मुलीसाठी ड्रेस शिवले. घरासाठी वस्तू तयार केल्या. झाडं लावली. बागकाम केले. आणि बरेच पदार्थही केले. मनात विचार आला नवीन ब्लॉग काढण्यापेक्षा , याच गोष्टी इथे शेअर केल्या तर. मग सरळ  ब्लॉग चे नावही बदलून टाकले. 

तर आता या पुढे अशाच काही गोष्टी लिहित जाईन. सुरुवात मुलीसाठी ड्रेस शिवला त्यापासून करावी म्हणते. पुढचे पोस्ट त्यावरच टाकीन.

(हेडर मधला फोटो मी काढलेला नाही. )


Wednesday, March 25, 2009

Why good things happen with bad people?

एका पार्टित ऐकलेली गोष्ट.

प्राक्तन

एके काळी एका गावात दोन व्यापारी असतात. एकाच नाव सत्यवादी आणि दुसर्याच असत्यवादी. सत्यवादी नावाप्रमानेच सत्य बोलणारा, दुसर्याच भल चिंतणारा, मदत करणारा ,आशावादी मनुष्य असतो. तर या असत्यवादी आत्मकेंद्रीत, खोट बोलणारा, इतराना टोपी घालणारा निराशावादी मनुष्य असतो.
कशी काय कोण जाणे दोघांची मैत्री होते.
अर्थातच असत्यवादी आपल्या स्वभावाप्रमाने सत्यवादीचा नेहमीच फ़ायदा घेत असतो.
एकदिवस दुसया एका गावात एका साधु बाबांच आगमन होत.त्याना म्हणे जगाच मर्म उलगडलेल असत.
दोघे मित्र साधुबाबांना भेटायला जायच ठरवतात.
प्रवासात वाटेत रात्र होते आणि जंगल लागत. पाऊस सुरु होतो. आणि त्यात दोघांची चुकामुक होते. दोघे विरुद्ध दिशेने वाट फ़ुटेल तसे चालत रहातात.
सत्यवादी ला काट्यानी भरलेली वाट लागते. तुडवत, रक्तबंबाळ होत तो अन्न पाण्याविना चालत रहातो.
इकडे असत्यवादी पण वाट मिळेल तसा चालु लागतो. पण त्याच्या वाटेवर फ़ुलांचा सडा अंथरलेला असतो. ठिकठिकाणी फ़ळानी लगडलेली झाडे त्याला लागतात. जागोजागी असलेल्या अम्रुत तुल्य झर्याचे पाणी पिवुन असत्यवादी अगदी सुखात मार्गक्रमणा करीत रहातो.
अचानक त्या दोघाची भेट एका फ़ाट्याजवळ होते.
भुकेन व्याकुळ झालेल्या सत्यवादीला, असत्यवादी आपला सोन्याच्या मोहरानी भरलेला रांजण दाखवतो आणि आपल्या सुरेल प्रवासाच वर्णन करतो.
"अच्छा दोस्ता , मला आता घरी गेल पाहिजे. साधु बाबांकडे जाण्याची आता मला गरज वाटत नाही." आणि असत्यवादी घराकडे परतायला निघतो.
खिन्न झालेला सत्यवादी एकटाच साधुबाबांकडॆ पोहोचतो.
"मी अस काय केलेल म्हणुन माझ्या वाट्यास हे भोग यावेत. आयुष्यभर चांगला वागलो तरी माझ्या वाट्यास हे फ़ळ. " सत्यवादीची त्याच्या मुल्यांवरची निष्ठा डळमळीत होवु लागली होती.
"चुकतोयस तु . उलट आज तुझ्या पुण्य कर्मांमुळ तुझी एका मोठ्या संकटातुन सुटका झाली आहे." बाबा सत्यवादीला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
हं. आता याच्यापेक्षा कुठल मोठ संकट असणार होत." सत्यवादी थोडा कडवट पणे म्हणतो.
"आज तुझ्या नशिबात 'मॄत्युयोग' होता. पण तुझ्या पुण्य कर्मानी तो योग तु पुढे ढ्कललास." साधुमहाराज स्मितहास्य करीत म्हणाले.
क्षणभर तीथे निरव शांतता पसरली.
सत्यवादीच मन देवाच्या दयेन उचंबळुन येत.घरातली त्याची वाट पहाणारी चिमुकली तोंड आठवतात.
"महाराज , पण तरीही एक प्रश्न उरतोच. असत्यवादीला तो सोन्याचा रांजण का मिळाला?"
"खरतर आज त्याच्या नशिबात राजयोग होतो.सार्या जगाचा सम्राट होणार होता तो. मोजता सुद्धा येणार नाही अशा संपतीचा मालक. पण एका रांजणावर त्यान आज समाधान मानुन घेतल. "साधुबाबा हसत म्हणाले.
"प्राक्तनात असलेल कधीही चुकत नाही."
सत्यवादीन साधुबाबाना नमस्कार केला आणि तो आपली मार्गक्रमणा करण्यास सज्ज झाला.

Thursday, October 04, 2007

मित्र

एखादा जुना मित्र अचानक खुप दिवसानी (बहुदा orkutवर) दिसतो,अगदी मनापासुन त्याला भेटावस वाटत असत ,निदान फ़ोन तरी,अगदीच काही नाही तरी निदान एखादी ईमेल.
पण ... असेच एका मागुन एक दिवस उलटत जातात. आज करु उद्या करु अशी चाल ढ्कल करता एक दिवस असा येतो कि .........फ़ोन करण्यात आणि मेल लिहिण्यात काही अर्थच उरत नाही.
बर,पटकन विषय काढुन मित्राशी सध्याच्या comman नसलेल्या संदर्भावर काहीतरी casual बोलाव तर तेही करता येत नाही. मित्रालाही बहुदा तसच वाटत असत. अवघडल्यासारख.
भरपुर गप्पा चालु असताना अचानक मध्येच एकदम शांतता पसरल्यावर कस वाटत ना अगदी तस वाटत अशावेळी......
एक दिवस तो अचानक भेटलेला जुना मित्रही मग स्मरणातुन जातो किंवा निदान आपण तस pretend तरी करतो.

माझा हा blog म्हणजे जुन्या एखाद्या मित्रा सारखा वाटायला लागलाय मला.

Sunday, August 27, 2006

सुखकर्ता


गणराया,विघ्नहर्त्या, सगळ्याना सुखी ठेव. सगळ्याना चांगली बुद्धी दे. तुझ्या आशीर्वादान सगळ्यांच मंगल होवुदे.

Tuesday, July 04, 2006

समर

नेहमी टोर्नडो,हुरिकेन ,Thunderstorm Warning किंवा हिट इन्डेक्स या पैकीच काहीतरी सांगणारं Weather चॅनल.
रात्रभर झड लावलेला पाऊस.
आणि पहाटे पहाटे पक्षाचा किलबिलाट ऐकत येणारी जाग.
सकाळी ब्लाईंन्ड्सच्या फ़टीतुन,जाळीदार पडद्यातुन चुकारपणे आत येणारी सुर्यकिरण.
थोड्याचवेळात स्वच्छ सुर्यप्रकाशान झगमगु लागलेल घर.
w/e ला Farmer's मार्केट मधला फ़ेरफ़टका.
हिरव्यागार उन्हाळी काकड्या ,कोबी, asparagus, काले ,ripened tomatos,हिरवे कान्दे ,झुकिनी, जांभळे नवलकोल,peas,भेंडी,मुश्रूम्स,सलाडचे विविध प्रकार, sqash यानी भरगच्च भरलेल्या बास्केट्स.
ब्ल्यु बेरी, स्ट्रॉबेरी , रॉसबेरीज,मेक्सीकन मॅन्गोज,कोवळ्या कणसांचे ढिग .
watermelons,cantaloupe,honeydews, चेरीज,लीची,पपई,पिअर्स,apricots यांचा भरुन राहिलेला वास.
ताज्या कट केलेल्या लव्हेन्डरचा ,गुलांबाचा सुगंध.
चकचकित उन्हात आखलेले Botanical garden मधले picnics.
झु मधली train सफ़ारी.
park ,स्विम्मिंग पूल मध्ये उसळलेला पोरांचा धुडगुस.
सुर्यास्ताच्यावेळी क्षितीजावर पसरलेले,रेंगाळणारे फ़िकट जांभळट केशरी रंग.
नर्सरी तली नविन कोरी रोप.
भाज्याच्या पसरलेल्या बीया.
नाजुक पालेभाज्यांची डुलणारी पान.
मंद झुळुका अनुभवत,बॅकयार्ड मधल्या झोक्यावर झुलताना दिसणारे झाडाचे हिरवेकंच रंग.
कुणीतरी लॉन mow करताना येणार तो करकरीत वास.
ताज्या गवताचा तो कोवळाशार लुसलुशीत स्पर्श.
4 th july च्या पार्टीचे प्लॅन्स.
मध्यरात्री पर्यन्त आकाश नक्षत्रानी भरुन टाकणारे फ़ायरवर्क्स आणि ते जास्तीत जास्त कुठुन चांगल दिसेल ते पहाण्यासाठी तासभर फ़िरवलेली कार.
बार्बेक्युज.
पाय दुखेपर्यंत केलेली पीच field trip.
स्व:ता तोडलेल्या peaches चा केलेला cobbler.
स्कर्ट्स आणि सॅन्डल्स घालुन चालताना येणारा फ़ताक फ़ताक आवाज.
vacation चे प्लॅन्स.
बीच वर अनवाणी पायाना गुदगुल्या करनारा वाळुचा तो ओलसर स्पर्श.
आणि लांबच लांब रात्री.
ऒह! I just Love Summer. Just..... Love It.

मला या सुंदर वातावरणात चुपके चुपके मधल ते "चुपके चुपके चल दी पुर्वईया .... हे गाणच आठवत.गाण्यातली ती तीन्हीसांज मला इथल्या समर मधल्या संध्याकाळसारखीच वाटते.
तसच वातावरण "किसीसे ना कहना" ह्या चित्रपटातल्या दिप्ती नवल झारीनं झाडाना पाणी घालत गायलेल्या गाण्यात आहेत.(त्या गाण्याचे शब्द काही केल्या मला आता आठवत नाही आहेत.)
मुखर्जीच्या, बासुदांच्या चित्रपटात camera चा प्रत्येक angle टवटवीत असतो. गाण्यात especially एक वेगळच वातावरण असत.पावुस झाल्यावर चमकणाऱ्या भिजलेल्या सुर्यकिरणांसारख.

एकतर त्यांचे चित्रपट भारतातल्या पावसाळ्यात पहावेत नाहीतर इथल्या निवांत समरमध्ये.
Especially बासुदांचा "छोटीसी बात".संपुर्ण चित्रपटात खंडाळ्याच्या पावसाळी वातावरणाचा तरल आणि soft effect जाणवत रहातो. चित्रपटात अमोल पालेकर गॅलरीमध्ये विद्या सिन्हाला बाय बाय करत असतो तेव्हा "ये दिन...." गाण सुरु असत. आणि पाउसही. का कोण जाने पाऊस आला कि ते गाण आणि अमोल पालेकरचा भाबडा चेहराच लक्षात येतो.

इतके दिवस काही लिहायला मिळाल नाही आणि फ़ारस वाचायलाही. (जणु काही कोणी मी लिहिलेल वाचन्याची वाटच बघत होत :P)असो. पण बाहेर वातावरण इतक सुरेख झाल्यावर काहीतरी खरडलच पाहिजे. नाही का?

Sunday, May 14, 2006

आईच मागणं

सतत मागामागी करु नये,अधिक पैशाच्या माग लागु नये,हावरट्पणा करु नये,उगाचच आळशासारख बसु नये,नेहमी उद्योगी असाव,भरपुर कष्ट करावेत,समाधानान आनंदी रहाव,तक्रारी करु नयेत आईच्या अनेक सुचनांमधल्या या काही सुचना.

यशस्वी,समाधानी,शहाणी, शिकलेली, आदर्श मुल असावीत अस जस जगातल्या सगळ्या "आई" लोकाना वाटत तसच माझ्या आईला ही वाटत.

अलिकडे मी तिच्याकडुन फ़ारस काही मागत नाही म्हणुन काल ती कधी नाही ते कौतुकान मला म्हणाली "तु अगदी शहाणी मुलगी झाली आहेस बघ.नाहीतर काहीजणांच्या मागण्या बघ,कधीच संपत नाहीत.पण तु तशी झाली नाहीस.मला बर वाटत. "

आई मला अगदी परफ़ेक्ट समजत होती.खरतर माझ्या असंख्य मागण्या असतात. हे हव, ते हव अस चालुच असत माझं नेहमी.
मला अगदीच ओशाळल्यासारख झाल . ती मला आदर्श समजत होती आणि ती मी नक्कीच नव्हते.

विचारात असताना अचानक माझ्या लक्षात आल, आईला मी perfect नाही अस सांगुन वाद घालत बसण म्हणजे तीन "आई" चा रोल यशस्वीरित्या पार पाडला नाही असचं सांगण्यासारख होत.

आपली तत्व आपल्या मुलानी आचरणात आणावीत, यशस्वी व्हाव आणि आपल्या पुढील पिढीलाही ते संस्कार द्यावेत हेच तर "आई" च यश आहे. आणि ते काम तीन अगदी perfect केल होत.आयुष्यभर हेच मागण तीन देवाकडुन मागितल होत.
काही गोष्टी तीलाही कधीकधी जमल्या नव्हत्या. पण आम्ही त्या करुन दाखवाव्यात अस मनापासुन तीला वाटत असत. त्याचा तिला अभिमान असतो.

आता आम्ही तीच्यापासुन लांब रहाताना तीला उगाच धाकधुक असते. आम्हाला वाढविताना काही चुकल तर नाही ना याची काळजी वाटत असते.
नुकतीचं पन्नाशीला पोहाचलेली ती थोडीशी रिकामी झालेली असते.जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात. अशावेळी कुणाकडुन तरी तीला "Good Job ,Well done" असे शब्द हवे असतात.
आईला अस काही म्हणण्याची पद्धत नाही. आपण तीचा "good job" गृहितच धरतो.
खरतर मुलं "चांगली" निघण्यातच तीच्या कष्टाच सारं चीज सामावलेलं असतं.

म्हणुणच मग "मी pefect नाही" हे तीला पटवायचा मी प्रयत्नच करीत नाही.

"हो ग आई. तु शिकवलेल मी काही विसरले नाही बघ.thanks आई. "मी नकळत तीला सांगुन टाकते.
ती मग विषय बदलुन इतर काहीतरी बोलत रहाते.पण ...
मला माहित आहे आपली पोरं वाया गेली नाही हे पाहुन तिन आनंदान मान डोलावली असेल, सुस्कारा सोडला असेल आणि ती समाधानान पदर खोचुन पुढच्या कामाला लागली असेल.
"आई" होण सोप नसत. ती नेहमीच म्हणते. आणि ते बरोबरच आहे म्हणा.
कारण afterall "Mom Is Always Right"

Wednesday, May 10, 2006

पुस्तक माझे मित्र

नंदन,ट्युलिप तुमचे मनापासुन आभार या खेळात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल.खरतर आता तुम्ही लोकानी इतक उच्च लिहिल्यावर मी काय डोंबल लिहिणार? खरच खुप मस्त लिहिलय तुम्ही.
स्वताच्या आवडीनीवडी विषयी लिहायच म्हणजे मला भयंकर संकोचल्या सारख होत. कारण माझ्या आवडी निवडी सारख्या बदलत असतात आणि मला अचानक कधीही काहीही आवडु/नावडु शकत.आणि त्यात काहीच संगतीही नसते.एकाचवेळी मला इजाजत आणि गोविंदाचा कुली नं १(guilty pleasures)
असे दोन्ही चित्रपट आवडत असतात. त्यामुळ ठाम अशी काहीच आवड नाही.
तरीही ...........
साध सरळ,समजायला सोप अस वाचायला मला अधिक आवडत. त्यामुळ क्लिष्ट अति गंभिर अस मी वाचायला हातात घेतल तरी बहुदा ते माझ्याकडुन पुर्ण होत नाही.
अवती भवती माणस नसताना, माणस असुनही एकाकी वाटताना, सुखात आणि दु:खात, 'चिमणराव' पासुन ते नातीचरामी पर्यंत ही पुस्तकच बरेचवेळा माझी मित्र मैत्रीणी बनली आहेत.
A friend in need is friend indeed या उक्तीप्रमाणे पुस्तक खऱ्या अर्थान माझी friends च आहेत.
स्वप्नात रमायला मला जरा जास्तच आवडत त्यामुळे आता इथे मी माझ्या लहानपणापासुन पाहिलेल्या (जेव्हा परदेशाचा चेहराही मी पाहिला नव्हता)'त्या' स्वप्नाबद्दल लिहावच लागेल.

"आपल्या घरात एक library असावी आणि तीथे उंच छतापर्यंत जाणारी पुस्तकानी भरलेली shelf असावीत,लायब्ररीला एक मोठी फ़्रेंच विन्डॊ असावी.Antique आराम खुर्ची असावी.एकतर बाहेर स्नो भुरभुरत असावा किंवा इंग्लिश गार्डन तरी फ़ुललेल असाव.खिडकीतुन दिसणारा बाहेरचा निसर्ग न्याहाळत पुस्तकांच्या पानांचाही आवाज न करता, coffee घेत निवांत आपल आवडत पुस्त्तक वाचाव." हे माझ्या असंख्य स्वप्नापैकी एक A perfect ideal dream आहे.
लहानपणी पारायण केलेल्या माझ्या आवडत्या शेरलॉक होम्स च्या पुस्तकातुन मी ती गार्डन ची कल्पना उचलली असावी बहुदा. नंतर 'चौघीजणी' वाचल्यावर त्यात इतर डीटेल्सची भर पडली इतकच.

पण यातली एखादी गोष्ट missing असली तरी पुस्तक वाचण थोडीच थांबणार आहे? श्वास घेण्यासारख ती ही एक आवश्यक गोष्ट आहे.एखाद पुस्तक हातात घ्याव ,झपाटल्यासारख ते रात्रभर जागुन संपवाव आणि मग थोडे दिवसानी परत ते हळु हळु वाचाव. अस मी कितीतरी वेळा केल असेन. दुसऱ्यांदा का कोण जाणे पण नविन बाजु समोर येतात.वेगळे अर्थ सापडतात.
first impression is the last impression हे मला माणसांबद्दलच नव्हे तर पुस्तकांबद्दल सुद्धा पटतच नाही. तुमचे विचार,तुमची भुमिका बरेचवेळा तुम्ही वाचलेली,तुम्हाला आवडलेली/न आवडलेली पुस्तक स्पष्ट करत असतात.
पुस्तक आवडल नाही अस कधी म्हणाव जेव्हा ते बऱ्याच वर्षानंतर सुद्धा परत हातात घ्यायची इच्छा होत नाही.
असो. आता नमनाला इतक घडाभर तेल जाळल्यावर माझ पाल्हाळ बास करते.

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:

पाडस
मार्जोरी किनन रॉलिंग्ज यानी लिहिलेल आणि राम पटवर्धन यानी अनुवादित केलेल हे पुस्तक हातात घेतल कि शेवटच्या पानापर्यंत तीतक्याच उत्सुकतेन वाचल जात.

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती
दिडशे वर्षापुर्वी एका छोट्या मुलाच्या भावविश्वात बाप,आई आणि जंगलातल्या असंख्य चमत्कारिक गोष्टीबरोबरच एका हरनाच्या पाडसाच आगमन होत.दोघांच एकमेकांवर नितांत प्रेम आहे. किंबहुना त्यांच स्वताचच एक चिमुकल विश्व त्यानी तयार केलय.पण जगण्यासाठी त्या कोवळ्या मुलाच एक दिवस निरागस बालपण हरवत.त्याला फ़ार फ़ार मोठ व्हाव लागत . पुस्तकात म्हटलय तस "जीवन सुंदर आणि सोप असाव अस प्रत्येकालाच वाटत.जीवन सुंदर आहे.पण सोप नाही."
या वरच आधारीत पण छोट्या मुलाना वाचण्यासारख 'हरिण बालक ' ही छान आहे.
आणखी एक पुस्तक सध्या वाचलेल म्हणजे आशा बगेच ' सेतु'.आयुष्यातला महत्वाचा बराचसा कालखंड परदेशी घालवुन परत मायदेशी परतलेल्या आई,वडील आणि मुलगा यांच्यातील नातेसंबधावर तसच त्यांच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर भाष्य करणार हे पुस्तक आहे.मला हे पुस्तक फ़ारस पटल नाही.
भालचंद्र नेमाडेच 'कोसला ' ही थोडे दिवसापुर्वी वाचुन संपवल.वाचल्यावर पटतच नाही कि लिहिलेल सगळ कल्पनेवर आधारीत आहे. आत्मचरित्रासारखा कादंबरीचा ढाचा असला तरी अवती भवतीच्या सामाजीक स्थित्यंतराच फ़ार मार्मीक वर्णन केलय नेमाड्यानी. एकदा तरी वाचाव अस अस वेगळ पुस्तक.
'एका चुलीची गाणे' हा 'शांता शेळके' यांचा नुकताच वाचलेला कथासंग्रह ही सुंदर आहे.
चकवा चांदण ,हसरे दु:ख हे चार्ली चॅप्लीन वर आधारीत आणि सुधा मुर्तीच कथा माणसाच्या, आता वाचीन.


३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके

काय लिहु आणि काय नको अस झालय मला.

१.स्मरणगाथा
२.स्मृतीचित्रे
३.आहे मनोहर तरी
४.मोगरा फ़ुलला
५.श्रीमानयोगी

याव्यतिरिक्त माझ्या all time favourite पुस्तकांची यादी द्यायचा मोह मला आवरत नाही आहे.
साधी सरळ,भाबडी आणि ७० किंवा त्यापुर्वीच चित्रण असणारी पुस्तक वाचायला तर मला खुपच आवडत.
त्यात मग निवडक द. मा मिरासदार,बंडु मोकाट सुटतो,चिमणराव,असामी असा मी ,झुळुक,पुन्हा झुळुक अशी असंख्य पुस्तक माझ्या आवडीची आहेत.

आनंदी गोपाळ,स्वामी,मृत्युंजय,ययाती,पुर्वरंग,व्यक्ती आणि वल्ली राजा रवि वर्मा,छावा,एक होता कार्वर, ही पुस्तक न वाचलेले मराठी लोक फ़ारच कमी असतील नाही?

ऑक्टोपस , महानंदा , झोंबी , नाच ग घुमा , एक होती आजी, तुंबाडचे खोत , पडघवली ,शितु , बनगरवाडी माणदेशाची माणस,ईडली,ऑर्कीड आणि मी ही माझी आणखी काही आवडीची पुस्तक.

जी ए ची पिंगळवेळ,काजळमाया ,रमलखुणा,काजळमाया,निळासावळा दर वेळी मी नव्यान वाचते आणि नविनच अर्थ त्यातुन काढायचा प्रयत्न करते.अर्थात हे मुंग्यानी मेरु पर्वत गिळण्याचा प्रयत्न केल्यासारख आहे ते.

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके

१. शाळा मिलिंद बोकिल
२.गोठलेल्या वाटा शोभा चित्रे
३.हंस अकेला मेघना पेठे
४.ऐसपैस गप्पा दुर्गाबाईशी प्रतिभा रानडे
५.चीनी माती मीना प्रभु

५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे

'स्मृतीचित्रे' हे पुस्तक मला फ़ार आवडत.साध्या साध्या गोष्टीत आनंद ,सुख शोधणाऱ्या,प्रसंगी स्व:तावर विनोद करनाऱ्या लक्ष्मीबाई बद्दल मला नितांत आदर वाटतो. बाळबोध मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात कुठही " मी जिद्दीने काही मिळवल" असा अभिनिवेश नाही. आव नाही. कुठेही आपण कस दु:ख सोसल त्याच चर्हाट नाही. पुस्तकाच्या मागे लिहिलय " कोणतेही प्रचलीत शिक्षण न घेता केवळ कठीन परिस्थितीशी लढा देवुन मन किती सुससंकृत होवु शकते याचे चित्रण या पुस्तकात आढळते."
कितीही वेळा वाचल तरी परत परत वाचाव असच पुस्तक आहे "स्मृतीचित्रे".

पुढचा डाव
गिरिराज
मिंट्स
कुल_सुभाष
खेळणार का तुम्ही?

Sunday, April 16, 2006

नवी सुरुवात

आपण जे 'नाही' आहोत ते 'असण्याचा' आभास निर्माण करण म्हणजेच "Stupid" असण अशी stupid या शब्दाची नविन व्याख्या oprah न परवाच्या कार्यक्रमात केली.
म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसली तरी इतर चार लोकाना ती आवडते म्हणुन आपल्याला पण आवडते अस म्हणन,पटल नाही तरी आपण वेगळं पडन्याच्या भितीन पटल अस सांगण अशा कित्येक गोष्टी यात येतील.
एकुण काय कि खोट्या मुखवट्याखाली स्वताला दडपुन टाकायच.
स्वताला नेमक काय हवय ते कधीच न कळण हे आणखी एक stupid असण्याच लक्षण.
आपल्या पैकी कित्येक जण अस कितीतरी वेळा करीत असतील. गरज पडेल तेव्हा,वेळेनुसार आपण मुर्ख बनतच असतो.
कारणं अनेक ,पण बरेचवेळा आपल खर रुप झाकण्याचा आपण प्रयत्न करीत असतोच.
आज हे लिहिण्याच कारण म्हणजे खऱ्या अर्थान मी एका नविन विश्वात, माझ्या आवडत्या जगात पाऊल टाकत आहे.
Yeah, मी परत विद्यार्थी व्हायच ठरवल आहे.पण यावेळेस माझ्या आवडत्या विषयाची. समोर उभ असलेल चांगल करियर(पण मला फ़ारस न आवडनार) आणि मेहनतीन मिळवलेला अनुभव या सगळ्याला मागे टाकुण मी नव्यान, नवी डीग्री घ्यायच ठरवलय.
बऱ्याचजणानी मला वेड्यात काढलय. Dream Job वैगरे काही नसत असही सुनावलय. पण माझा निर्धार अगदी पक्का झालाय.
काही स्वप्न उघड्या डोळ्यानी ,जागेपणी पाहिली तरीही ती खरी होतात का ते मला माहित नाही.
पण मला हे नक्कीच माहित आहे की अस ,हाताशी असलेला हुकमी एक्का टाकुन नव्यान हा जुगार खेळण तितक सोपही नाही.
पण कधी कधी ना मी हे करणारच होते. माझा निर्णय कदाचीत बरोबर ठरेल आणि कदाचीत अपयशी सुद्धा ठरेल.
पण निदान मनाजोग काम करण्याच समाधान नक्कीच मिळेल.
नव्यान मला जे आवडत तेच करण आणि ज्यात माझ मन कधीच रमल नाही त्याचा त्याग करण हे अगदी 'Dream come True' सारख आहे.
त्यामुळ सध्या तरी 'Am I being stupid? ' या प्रश्नाच उत्तर 'No,I am not" असच आहे.