नंदन,ट्युलिप तुमचे मनापासुन आभार या खेळात मला सहभागी करुन घेतल्याबद्दल.खरतर आता तुम्ही लोकानी इतक उच्च लिहिल्यावर मी काय डोंबल लिहिणार? खरच खुप मस्त लिहिलय तुम्ही.
स्वताच्या आवडीनीवडी विषयी लिहायच म्हणजे मला भयंकर संकोचल्या सारख होत. कारण माझ्या आवडी निवडी सारख्या बदलत असतात आणि मला अचानक कधीही काहीही आवडु/नावडु शकत.आणि त्यात काहीच संगतीही नसते.एकाचवेळी मला इजाजत आणि गोविंदाचा कुली नं १(guilty pleasures)
असे दोन्ही चित्रपट आवडत असतात. त्यामुळ ठाम अशी काहीच आवड नाही.
तरीही ...........
साध सरळ,समजायला सोप अस वाचायला मला अधिक आवडत. त्यामुळ क्लिष्ट अति गंभिर अस मी वाचायला हातात घेतल तरी बहुदा ते माझ्याकडुन पुर्ण होत नाही.
अवती भवती माणस नसताना, माणस असुनही एकाकी वाटताना, सुखात आणि दु:खात, 'चिमणराव' पासुन ते नातीचरामी पर्यंत ही पुस्तकच बरेचवेळा माझी मित्र मैत्रीणी बनली आहेत.
A friend in need is friend indeed या उक्तीप्रमाणे पुस्तक खऱ्या अर्थान माझी friends च आहेत.
स्वप्नात रमायला मला जरा जास्तच आवडत त्यामुळे आता इथे मी माझ्या लहानपणापासुन पाहिलेल्या (जेव्हा परदेशाचा चेहराही मी पाहिला नव्हता)'त्या' स्वप्नाबद्दल लिहावच लागेल.
"आपल्या घरात एक library असावी आणि तीथे उंच छतापर्यंत जाणारी पुस्तकानी भरलेली shelf असावीत,लायब्ररीला एक मोठी फ़्रेंच विन्डॊ असावी.Antique आराम खुर्ची असावी.एकतर बाहेर स्नो भुरभुरत असावा किंवा इंग्लिश गार्डन तरी फ़ुललेल असाव.खिडकीतुन दिसणारा बाहेरचा निसर्ग न्याहाळत पुस्तकांच्या पानांचाही आवाज न करता, coffee घेत निवांत आपल आवडत पुस्त्तक वाचाव." हे माझ्या असंख्य स्वप्नापैकी एक A perfect ideal dream आहे.
लहानपणी पारायण केलेल्या माझ्या आवडत्या शेरलॉक होम्स च्या पुस्तकातुन मी ती गार्डन ची कल्पना उचलली असावी बहुदा. नंतर 'चौघीजणी' वाचल्यावर त्यात इतर डीटेल्सची भर पडली इतकच.
पण यातली एखादी गोष्ट missing असली तरी पुस्तक वाचण थोडीच थांबणार आहे? श्वास घेण्यासारख ती ही एक आवश्यक गोष्ट आहे.एखाद पुस्तक हातात घ्याव ,झपाटल्यासारख ते रात्रभर जागुन संपवाव आणि मग थोडे दिवसानी परत ते हळु हळु वाचाव. अस मी कितीतरी वेळा केल असेन. दुसऱ्यांदा का कोण जाणे पण नविन बाजु समोर येतात.वेगळे अर्थ सापडतात.
first impression is the last impression हे मला माणसांबद्दलच नव्हे तर पुस्तकांबद्दल सुद्धा पटतच नाही. तुमचे विचार,तुमची भुमिका बरेचवेळा तुम्ही वाचलेली,तुम्हाला आवडलेली/न आवडलेली पुस्तक स्पष्ट करत असतात.
पुस्तक आवडल नाही अस कधी म्हणाव जेव्हा ते बऱ्याच वर्षानंतर सुद्धा परत हातात घ्यायची इच्छा होत नाही.
असो. आता नमनाला इतक घडाभर तेल जाळल्यावर माझ पाल्हाळ बास करते.
१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
पाडसमार्जोरी किनन रॉलिंग्ज यानी लिहिलेल आणि राम पटवर्धन यानी अनुवादित केलेल हे पुस्तक हातात घेतल कि शेवटच्या पानापर्यंत तीतक्याच उत्सुकतेन वाचल जात.
२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहितीदिडशे वर्षापुर्वी एका छोट्या मुलाच्या भावविश्वात बाप,आई आणि जंगलातल्या असंख्य चमत्कारिक गोष्टीबरोबरच एका हरनाच्या पाडसाच आगमन होत.दोघांच एकमेकांवर नितांत प्रेम आहे. किंबहुना त्यांच स्वताचच एक चिमुकल विश्व त्यानी तयार केलय.पण जगण्यासाठी त्या कोवळ्या मुलाच एक दिवस निरागस बालपण हरवत.त्याला फ़ार फ़ार मोठ व्हाव लागत . पुस्तकात म्हटलय तस "जीवन सुंदर आणि सोप असाव अस प्रत्येकालाच वाटत.जीवन सुंदर आहे.पण सोप नाही."
या वरच आधारीत पण छोट्या मुलाना वाचण्यासारख 'हरिण बालक ' ही छान आहे.
आणखी एक पुस्तक सध्या वाचलेल म्हणजे
आशा बगेच ' सेतु'.आयुष्यातला महत्वाचा बराचसा कालखंड परदेशी घालवुन परत मायदेशी परतलेल्या आई,वडील आणि मुलगा यांच्यातील नातेसंबधावर तसच त्यांच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर भाष्य करणार हे पुस्तक आहे.मला हे पुस्तक फ़ारस पटल नाही.
भालचंद्र नेमाडेच
'कोसला ' ही थोडे दिवसापुर्वी वाचुन संपवल.वाचल्यावर पटतच नाही कि लिहिलेल सगळ कल्पनेवर आधारीत आहे. आत्मचरित्रासारखा कादंबरीचा ढाचा असला तरी अवती भवतीच्या सामाजीक स्थित्यंतराच फ़ार मार्मीक वर्णन केलय नेमाड्यानी. एकदा तरी वाचाव अस अस वेगळ पुस्तक.
'एका चुलीची गाणे' हा 'शांता शेळके' यांचा नुकताच वाचलेला कथासंग्रह ही सुंदर आहे.
चकवा चांदण ,हसरे दु:ख हे चार्ली चॅप्लीन वर आधारीत आणि सुधा मुर्तीच कथा माणसाच्या, आता वाचीन.
३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तकेकाय लिहु आणि काय नको अस झालय मला.
१.स्मरणगाथा
२.स्मृतीचित्रे
३.आहे मनोहर तरी
४.मोगरा फ़ुलला
५.श्रीमानयोगी
याव्यतिरिक्त माझ्या all time favourite पुस्तकांची यादी द्यायचा मोह मला आवरत नाही आहे.
साधी सरळ,भाबडी आणि ७० किंवा त्यापुर्वीच चित्रण असणारी पुस्तक वाचायला तर मला खुपच आवडत.
त्यात मग
निवडक द. मा मिरासदार,बंडु मोकाट सुटतो,चिमणराव,असामी असा मी ,झुळुक,पुन्हा झुळुक अशी असंख्य पुस्तक माझ्या आवडीची आहेत.
आनंदी गोपाळ,स्वामी,मृत्युंजय,ययाती,पुर्वरंग,व्यक्ती आणि वल्ली राजा रवि वर्मा,छावा,एक होता कार्वर, ही पुस्तक न वाचलेले मराठी लोक फ़ारच कमी असतील नाही?
ऑक्टोपस , महानंदा , झोंबी , नाच ग घुमा , एक होती आजी, तुंबाडचे खोत , पडघवली ,शितु , बनगरवाडी माणदेशाची माणस,ईडली,ऑर्कीड आणि मी ही माझी आणखी काही आवडीची पुस्तक.
जी ए ची पिंगळवेळ,काजळमाया ,रमलखुणा,काजळमाया,निळासावळा दर वेळी मी नव्यान वाचते आणि नविनच अर्थ त्यातुन काढायचा प्रयत्न करते.अर्थात हे मुंग्यानी मेरु पर्वत गिळण्याचा प्रयत्न केल्यासारख आहे ते.
४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके१. शाळा मिलिंद बोकिल२.गोठलेल्या वाटा शोभा चित्रे३.हंस अकेला मेघना पेठे४.ऐसपैस गप्पा दुर्गाबाईशी प्रतिभा रानडे५.चीनी माती मीना प्रभु५)एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे'स्मृतीचित्रे' हे पुस्तक मला फ़ार आवडत.साध्या साध्या गोष्टीत आनंद ,सुख शोधणाऱ्या,प्रसंगी स्व:तावर विनोद करनाऱ्या लक्ष्मीबाई बद्दल मला नितांत आदर वाटतो. बाळबोध मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात कुठही " मी जिद्दीने काही मिळवल" असा अभिनिवेश नाही. आव नाही. कुठेही आपण कस दु:ख सोसल त्याच चर्हाट नाही. पुस्तकाच्या मागे लिहिलय " कोणतेही प्रचलीत शिक्षण न घेता केवळ कठीन परिस्थितीशी लढा देवुन मन किती सुससंकृत होवु शकते याचे चित्रण या पुस्तकात आढळते."
कितीही वेळा वाचल तरी परत परत वाचाव असच पुस्तक आहे "स्मृतीचित्रे".
पुढचा डाव
गिरिराजमिंट्सकुल_सुभाषखेळणार का तुम्ही?